किंग कोहलीचा ‘नवा लूक’
आयपीएलपूर्वी बदललेल्या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चॅम्पियन ट्रॉफीनंतर येत्या काही दिवसांत टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली आता आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वीच कोहलीने आपला लूक बदलला आहे. त्याच्या या नवीन लूकने सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घातला असून त्याचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तो त्याची नवीन हेअरस्टाईल दाखवत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी कोहलीने आपली हेअरस्टाईल बदलली होती. तेव्हा प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट जॉर्डन तबाकमन यांनी कोहलीला एक नवीन लूक दिला होता. आता, भारतातील प्रसिद्ध सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट आलिम हकीम यांनी कोहलीला एक नवीन लूक दिला आहे. हकीम यांनी त्यांच्या सोशल मीडियावर कोहलीच्या नव्या लूकमधील फोटो पोस्ट केले आहेत. नवीन हेअरस्टाईल आणि कोरलेल्या दाढीमधील कोहलीचा नवीन लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. या स्टार खेळाडूच्या आकर्षक स्लीक लूकवर नेटिझन्स आश्चर्यचकित झाले आहेत.