‘किंग कोहली’चा कसोटी क्रिकेटला अलविदा
विराट म्हणतो निर्णय सोपा नव्हे, पण योग्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा सर्वांत यशस्वी कसोटी कर्णधार आणि एक दशकाहून अधिक काळ फलंदाजीचा आधारस्तंभ राहिलेल्या विराट कोहलीने सोमवारी कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली. जागतिक ‘टी-20’ लाटेदरम्यान कसोटी क्रिकेटचा तारणहार अशी प्रतिमा बनलेल्या या खेळाडूचे क्रिकेटच्या पाच दिवसांच्या स्वरुपाशी असलेले संबंध यामुळे संपुष्टात आले आहेत.
हा निर्णय घेणे सोपे नव्हते हे मान्य करणाऱ्या 36 वर्षीय कोहलीने भारतासाठी 123 कसोटी सामन्यांमध्ये 30 शतके आणि 31 अर्धशतकांसह 46.85 च्या सरासरीने 9230 धावा केल्या. तो आता फक्त एकदिवसीय सामन्यांमध्येच दिसणार आहे. कारण कॅरिबियनमध्ये भारताच्या टी-20 विश्वचषक विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर गेल्या वर्षी त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्ती घेतलेली आहे.
‘मी खेळाबद्दल, मी ज्यांच्यासोबत मैदानात वावरलो त्यांच्याबद्दल आणि वाटेत मला घडविणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल ह्रदयात कृतज्ञता घेऊन निघून जात आहे’, असे कोहलीने त्याच्या ‘इंस्टाग्राम पेज’वर जाहीर केले. यामुळे या वर्षाच्या सुऊवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर कसोटीतील त्याच्या भविष्याबद्दल सुरू झालेल्या अटकळींना पूर्णविराम मिळाला आहे. 2011 मध्ये देशाचा कसोटी कर्णधार बनल्यानंतर कोहलीने भारताला या प्रकारात अव्वल स्थानावर नेले आणि 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने 68 कसोटींपैकी 40 कसोटी जिंकल्या. यामुळे तो भारताचा सर्वांत यशस्वी आणि दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ, रिकी पाँटिंग आणि स्टीव्ह वॉ यांच्यानंतरचा जगातील एकंदरित चौथा सर्वांत यशस्वी कसोटी कर्णधार बनला. त्याने कर्णधार म्हणून 20 शतके देखील नोंदविली. कर्णधारपदी विराजमान असताना एखाद्या भारतीयाने केलेली ही सर्वाधिक शतके आहेत.
‘कसोटी क्रिकेटमध्ये मी पहिल्यांदा भारतीय संघातून खेळल्यापासून 14 वर्षे झाली आहेत. खरे सांगायचे तर या स्वरुपात मला इतका प्रवास घडेल याची मी कधीच कल्पना केली नव्हती. त्याने माझी परीक्षा घेतली, मला घडवले आणि आयुष्यभर सोबत राहतील असे धडे दिले’, असे कोहली पुढे म्हणाला. या मेगास्टारचा शेवटचा कसोटी सामना ऑस्ट्रेलियात झाला. तो एक निराशाजनक दौरा राहून त्याने तेथे फक्त एक शतक पूर्ण केले.
विराटला त्याच्या कारकिर्दीचा शेवट करताना 10 हजार धावांचा टप्पा पार करता आलेला नाही. त्यापेक्षा तो थोड्या धावांनी मागे राहिलेला आहे. एकेकाळी हा टप्पा तो सहज पार करेल असे मानले होते. मात्र या उजव्या हाताच्या फलंदाजाने सात द्विशतकांसह या प्रकारातील दिग्गज म्हणून स्वत:ची प्रतिमा उभी केलेली आहे. एखाद्या भारतीयाने कसोटी काढलेली ही सर्वाधिक द्विशतके आहेत. याबाबतीत सुनील गावस्कर (4), सचिन तेंडुलकर (6), वीरेंद्र सेहवाग (6) आणि राहुल द्रविड (5) या दिग्गज खेळाडूंपेक्षा तो पुढे आहे.
टी-20 लीगना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक मागणी आलेली असताना आणि त्यांना सर्वांत जास्त पाहिले जात असताना कोहलीच्या वलयाने चाहत्यांना कसोटी क्रिकेटकडे आकर्षित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. हे सर व्हिव्ह रिचर्ड्स यांनीही मान्य केले होते. विराटची शैली आणि आक्रमकतेची तुलना अनेकदा रिचर्ड्स यांच्याकडे केली जात असे. ‘मी या स्वरूपातून निवृत्त होत असताना, ते सोपे नाही, पण ते योग्य वाटते. मी माझ्या परीने सर्व योगदान दिलेले दिले आणि मला अपेक्षापेक्षा खूप जास्त परत मिळाले आहे. मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमीच हसतमुखाने पाहेन’, असे कोहलीने आपल्या निरोपाच्या संदेशात म्हटले आहे.
विराट कोहलीच्या निवृत्तीमुळे कसोटी क्षेत्रातील भारतीय दिग्गजांनी निरोप घेण्याची मालिका आणखी वाढली आहे. यापूर्वी डिसेंबरमध्ये रविचंद्रन अश्विनने, तर गेल्या आठवड्यात रोहित शर्माने या स्वरूपातून निवृत्ती घेतली होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोहली 2027 पूर्वी निवृत्त होण्याची अपेक्षा नाही. परंतु रोहितच्या अचानक निवृत्तीनंतर कसोटीमध्ये नवीन कर्णधाराच्या शोधात असलेल्या संघात विराटच्या निवृत्तीमुळे मोठी पोकळी निर्माण झाली आडे.