Kolhapur : हेरे परिसरात राजा हत्तीचा धुमाकूळ ; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
हेरे, गुडवळे, बाघोत्रे परिसरात हत्तीचा मुक्त संचार
हेरे : गेल्या दोन दिवसापासून हेरे परिसरात राजा हत्तीने धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. अगदी दिवाळीच्या मुहूर्तावर राजा हत्ती खळणेकरवाडी, गुडवळे, खामदळे, हेरे, बाघोत्रे या परिसरात वावरत आहे.
भात, ऊस, भुईमूग व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याबबत शेतकऱ्यांनी वनविभागाकडे धाव घेतली असून वनविभागाने पंचनामे करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी या परिसरात गविरेडे, रानडुक्कर, मोर, माकड या बन्यप्राण्यांचा मोठा त्रास होता. मात्र आता हत्तीच शिवारात दाखल झाल्याने शेताकडे जायला शेतकरी घाबरत ग्रामस्थात भितीचे वातावरण आहेत.
मंगळवारी रात्री हेरे धरण परिसरात राजा हत्तीने आपला मोर्चा वळवला. याची माहिती शेतकऱ्यांना मिळताच स्थानिक शेतकऱ्यांसह हत्तीला पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली. वनविभागाला याची सूचना देताच वनविभागाचे एक पथक हत्तीला पळवण्यासाठी दाखल झाले. सुतळी बॉम्ब व फटाक्यांचा वापर करत हतीला हुसकावून लावण्यात यश आले.
या परिसरात मोठा जंगल भाग असल्याने व पाण्याची तळी, धरण क्षेत्र असल्याने हतींना मुबलक पाणी व चारा मिळतो. शिवाय बन्य प्राण्यांना ऊस, भुईमूग व नाचणा, भात यासारखी पिके मिळतात. त्यामुळे बरेच दिवस या परिसरात राजा हत्तीचा मुक्काम बाढण्याची शक्यता आहे. हत्ती दिसताच तिथून पळ काढावी, त्याची कळ काढू नये अशी सूचना वनविभागाचे वनक्षेत्रपाल यांनी दिल्या आहेत.