कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

किलो सोने, आठ किलो चांदी..धूम चित्रपटाची नांदी

12:25 PM Nov 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘धूम-2’ सिनेमातून प्रेरणा घेऊन युवकाची गुन्हेगारीकडे वाटचाल : म्हणे जॉन अब्राहम आवडता अभिनेता

Advertisement

बेळगाव : प्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेते डॉ. राजकुमार यांच्या ‘बंगारद मनुष्य’ या चित्रपटाची प्रेरणा घेऊन अनेक उच्चशिक्षित तरुण शेतीकडे वळले होते. तरुणाईला समाजाला दिशा देणारे अनेक चित्रपट येऊन गेले. तसेच चित्रपटांची प्रेरणा घेऊन गुन्हेगारीत उतरणाऱ्या तरुणांची संख्याही काही कमी नाही. यमकनमर्डी पोलिसांनी सव्वाकिलो सोन्याचे दागिने चोरल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या युवकानेही चोरीसाठी सिनेमाचीच प्रेरणा घेतल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे.

Advertisement

‘धूम-2’ या चित्रपटाची प्रेरणा घेऊन चित्रपटाचा नायक जॉन अब्राहम जसे धूम स्टाईलने दुचाकी चालवायचा, गुन्हे करायचा. त्याचीच प्रेरणा घेत सुरेश मारुती नाईक ऊर्फ सनदी (वय 37) राहणार होसूर, ता. बेळगाव, सध्या राहणार महांतेशनगर या युवकाने धूम स्टाईलने चोऱ्या केल्याचे उघडकीस आले आहे. यासाठी चोरीच्या पैशातून तब्बल दहा लाख रुपये खर्च करून त्याने कावासाकी जी-900 ही बाईकही खरेदी केली होती.

यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरेशला अटक करून त्याची कसून चौकशी केली असता, अनेक धक्कादायक माहितीचा उलगडा झाला आहे. सुरेशवर बेळगाव शहर व जिल्ह्यात आजवर 21 चोरीची प्रकरणे नोंद आहेत. यमकनमर्डी, संकेश्वर, गोकाक, सौंदत्तीसह बेळगाव ग्रामीण, शहापूर, माळमारुती, टिळकवाडी, उद्यमबाग, मारिहाळ व हिरेबागेवाडी पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रातही त्याने यापूर्वी चोऱ्या केल्या आहेत.

गुणी युवक अशीच परिसरात सुरेशची ओळख 

सुरेश चोरी करतो, याची माहिती शेजाऱ्यांनाही नाही. ऐषोरामी जीवन जगण्यासाठी गुन्हे करणारा सुरेश एकदा आपल्या बाईकवरून घराबाहेर पडला तर रात्रीच घरी परतायचा. त्यामुळे गुणी युवक अशीच परिसरात त्याची ओळख आहे. यमकनमर्डी येथे 22 ऑक्टोबर रोजी त्याने एका घरातून 1 किलो 280 ग्रॅम सोने, साडेआठ किलो चांदी व सव्वालाख रुपये रोख रक्कम चोरली होती. थार जीपमधून त्याची विक्री करण्यासाठी कोल्हापूरला जाताना तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

श्रीमंतांची घरेच त्याचे लक्ष्य

बाईकवरून फिरून आधी तो बंद घरांची रेकी करायचा. श्रीमंतांची घरेच तो आपले लक्ष्य बनवत होता. चोरीच्या पैशातून आपल्या पत्नीच्या नावे खरेदी केलेली कावासाकी मोटरसायकल, यमकनमर्डी येथे चोरीसाठी वापरण्यात आलेली पल्सर मोटरसायकल व चोरलेले दागिने विकण्यासाठी वापरलेली महिंद्रा थार जीप पोलिसांनी जप्त केली आहे. धूम सिनेमा व जॉन अब्राहम हा नट आपला आदर्श असल्याचे त्याने अधिकाऱ्यांना सांगितले. स्वत: जिल्हा पोलीसप्रमुखांनीही यासंबंधीची माहिती दिली आहे.

चोरीचा छडा लावणाऱ्या पथकाचे जिल्हा पोलीसप्रमुखांकडून अभिनंदन

22 ऑक्टोबर रोजी यमकनमर्डी येथील चोरी प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस दलासमोर या प्रकरणाच्या तपासाचे आव्हान उभे ठाकले होते. तब्बल 1 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या दागिन्यांची चोरी झाली होती. पोलिसांनी ही घटना एक आव्हान म्हणून स्वीकारली. सीन ऑफ क्राईम ऑफिसर्स (सोको) टीमचीही तपास अधिकाऱ्यांना मदत झाल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले. जिल्ह्यात सोको टीममध्ये दहा अधिकारी आहेत. प्रत्येक उपविभागात दोन अधिकारी कार्यरत आहेत. वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या तपासामुळेच धूम स्टाईलने गुन्हे करणाऱ्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळणे शक्य झाले, असे सांगतानाच या मोठ्या चोरीचा छडा लावणाऱ्या पोलीस पथकाचे जिल्हा पोलीसप्रमुखांनी अभिनंदन केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article