कक्केरी बिस्टादेवी यात्रेत प्राणीहत्या टळली
दयानंद स्वामीजी, प्रशासनाचे प्रयत्न यशस्वी
बेळगाव : गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही कक्केरी, ता. खानापूर येथील शक्तीदेवता बिस्टादेवी यात्रा प्राणीहत्येशिवाय उत्साहात साजरी करण्यात आली आहे. पशुबळी, प्राणीहत्या रोखण्यासाठीच्या आपले अभियान यशस्वी झाले आहे, अशी माहिती विश्वप्राणी कल्याण मंडळ व बसवधर्म ज्ञानपीठाचे अध्यक्ष दयानंद स्वामीजी यांनी दिली आहे. पशुबळी व प्राणीहत्येशिवाय यंदाचीही यात्रा पूर्ण झाली आहे. जिल्हा प्रशासन, खानापूर तालुका प्रशासन, पोलीस, पशुसंगोपन, महसूल, पंचायत राज विभाग व बिस्टादेवी मंदिर प्रशासन, भाविकांनी यासाठी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे सांगत दयानंद स्वामीजींनी आनंद व्यक्त केला आहे. 1959 च्या कर्नाटक प्राणीहत्या प्रतिबंधक कायदा व उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये कक्केरी बिस्टादेवी यात्रेत प्राणीहत्या, पशुबळी रोखण्याबरोबरच मंदिरावरून पशु उडविण्यावर बंदी घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले होते.
प्रशासनाने या पार्श्वभूमीवर बंदोबस्तही केला होता. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक, खानापूरचे तहसीलदार प्रवीण गायकवाड, नंदगडचे पोलीस निरीक्षक एस. सी. पाटील, एस. एस. बदामी, चन्नबसव बबली, बी. एन. बेळवत्ती आदींच्या नेतृत्वाखालील दोनशेहून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गेल्या आठवड्याभरापासून प्राणीहत्या रोखण्यासाठी काम केले आहे. दयानंद स्वामीजींनीही प्राणीहत्या रोखण्यासाठी अहिंसा प्राणीदया संदेश यात्रेच्या माध्यमातून कक्केरी व परिसरात जनजागृती केली आहे. या पार्श्वभूमीवर दसरोत्सवानिमित्त झालेल्या यात्रेत प्राणीहत्येऐवजी नारळ वाढवून भाविकांनी देवीची भक्ती केली. भर पावसातही भाविकांच्या रांगा कमी झाल्या नाहीत, असे दयानंद स्वामीजी यांनी एका पत्रकाद्वारे सांगितले आहे.