बालमित्राला धमकावून चार-पाच मुलांनी उकळले सुमारे ४५ हजार रूपये
हॉटेलमधील खाद्यपदार्थ खाण्यासाठी धमकावित उकळले पैसे
कोल्हापूरातील एका नामवंत शाळेतील मुलांचा प्रताप
कोल्हापूर
शहरातील क्रेशर चौक परिसरातील एका शाळेतील आठवी, नववी मधील चार ते पाच मुलांनी हॉटेलमधील चमचमीत पदार्थ खाण्यासाठी लागणाऱ्या पैश्यासाठी आपल्याच बालमित्राला वेळोवेळी दमदाटी करून, त्याच्याकडून सुमारे ४५ हजार रूपये उकळले. तरीसुध्दा संबंधीत मुलांनी आपले कारनामे सुरूच ठेवल्याने, त्याच्याकडून होणाऱ्या पैश्याच्या मागणीची पुर्तता करण्यासाठी ‘त्या’ बालमित्राने चक्क स्वत:च्या आईच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळेची चोरी केली. या संपूर्ण प्रकाराचा भांडाफोड झाल्याने, संबंधीत शाळेने त्या चार ते पाच मुलांना काही दिवसासाठी डिसमिस केले आहे.
गडहिंग्लज तालुक्यातील एका गावातील सधन कुटूंब मुलाच्या शिक्षणासाठी कोल्हापूरांत राहण्यास आले आहे. या कुटूंबाने आपल्या पाल्याला क्रेशर चौक परिसरातील नामवंत अशा शाळेत शिक्षणासाठी घातले आहे. त्यांच्या मुलाबरोबर याच शाळेतील आठवी आणि नववीमध्ये शिक्षण घेत असलेल्या चार-पाच मुलांनी दोस्ती करीत, त्याला हॉटेलमधील समोसे, पावभाजी सारखे चमचमीत पदार्थ खाण्यासाठी लागणाऱ्या पैश्यासाठी दमदाटी करू लागले. या दमदाटीला भिऊन त्या मुलाने घरातून थोडे-थोडे पैसे चोरून त्यांची मागणी पुर्ण करू लागला. हा प्रकार गेल्या काही महिन्यापासून सुरू होता. गेल्या आठवड्यात त्या मुलाच्या हाती घरात पैसे न लागल्याने, त्यांने घरातील आईच्या गळ्यातील सोन्याच्या बोरमाळची चोरी केली. घरातून बोरमाळ लंपास झाल्याची माहिती समजताच त्या मुलाच्या आईने त्याला विश्वासात घेवून चौकशी सुरू केली. चौकशीमध्ये मित्राच्या दमदाटीला भिऊन घरातून पैश्यांच्या चोरीबरोबर सोन्याची बोरमाळ चोरल्याची सांगितले. हे ऐकून त्या मुलाच्या आईच्या पायाखालची वाळूच सरकली. तिने थेट शाळेत धाव घेवून, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यावरून शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी त्या चार-पाच मुलांना बोलावून घेवून, समोरा-समोर चौकशी केली. चौकशीमध्ये खाद्यपदार्थासाठी त्या मुलांनी आपल्या बालमित्राला वेळोवेळी दमदाटी करून, त्याच्याकडून पैसे उकळल्याची कबुली दिली. त्यावरून शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्या चार-पाच मुलांना शाळेतून डिसमिस केले आहे. हा संपूर्ण प्रकार जुना राजवाडा पोलिसांना सोमवारी दुपारी समजला. त्यांनी संबंधीत शाळेत धाव घेवून, या घडल्या प्रकाराची माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांनी त्या चार-पाच मुलासह त्याचे पालक आणि त्यांनी दमदाटी करून पैसे उकळलेल्या मुलासह त्याच्या पालकांना बोलावून पोलीस ठाण्यात आणून चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.