For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मडगावात ज्वेलरचे अपहरण फसले

09:31 AM Oct 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
मडगावात ज्वेलरचे अपहरण फसले
Advertisement

मारुती ओमनी कारमधून अपहरणाचा प्रयत्न : सकाळी मुलाला शाळेत सोडतेवेळची घटना

Advertisement

मडगाव : आके - मडगाव येथून  एका सोन्या - चांदीच्या व्यापाऱ्याचे अपहरण करण्याचा बुधवारी अयशस्वी प्रयत्न झाला. या आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना सायंकाळी उशिरापर्यंत यश आले नव्हते. याप्रकरणी फातोर्डा येथील कुणाल रायकर यांनी मडगाव पोलिसस्थानकात तक्रार केली आहे. अपहरण करण्याचा प्रयत्न हा सकाळी सकाळी घडल्यामुळे आके - मडगाव परिसरात भीतीचे वातवरण निर्माण झाले. कुणाल रायकर हे व्यवसायाने सोन्याचे व्यापारी असून अपहरणकर्ते त्यांच्या ओळखीचे असू शकतात, असाही तर्क तपास यंत्रणेच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.

बुधवारी सकाळी 7.45 वाजता मुलाला शाळेत सोडण्यासाठी कुणाल रायकर हे आके येथे आले होते. आपल्या मुलाला शाळेत सोडून ते परत आपल्या कारकडे येत होते. यावळी एका मारुती कारमधून तिघेजण आले. रायकर आपल्या कारजवळ पोचले तेव्हा या तिन्ही अनोळखी व्यक्तिनी रायकर यांना पिस्तुलाचा धाक दाखवून मारुती ओमनी कारमध्ये कोंबण्याचा प्रयत्न केला. मात्र, रायकर यांनी यावेळी प्रसंगावधान राखून त्यांच्याशी दोन हात केले तेव्हा आरोपी तेथून पळून गेले. या गडबडीत आरोपीकडे असलेल्या पिस्तुलाचे गोळ्या भरलेले मॅगझीन रायकर यांच्या कारमध्ये पडले. ते गोळ्यांचे मॅगझीन तेथेच सोडून आरोपी पळून गेले.

Advertisement

यावेळी काही स्थानिक नागरिकही तेथे जमले होते. तेही रायकर यांच्या साहाय्याला येण्याच्या तयारीत होते. एकंदर प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहूनच आरोपीनी तेथून काढता पाय घेतला. मडगाव पोलिसांनी शस्त्रास्त्र कायद्याच्या 3 व 25 कलमाखाली तसेच भारतीय न्याय संहितेच्या 138, 126 (2), 61 (2), 351 (2)  कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. सायंकाळी अशिरा मडगाव पोलिसस्थानकाकडे संपर्क केला तेव्हा संशयित हाती लागले नसल्याची माहिती ड्युटीवरील अधिकाऱ्यानी दिली. मात्र, आरोपींना पकडण्यासाठी पोलीस अनेक ठिकाणी गेले असल्याची माहिती सुत्रानी दिली.

संशयिताचे नाव आहे पोलिसांकडे !

या अपहरणासंबंधी तक्रारदार कुणाल रायकर यांनी एका संशयिताचे नाव पोलिसाना सांगितले असून हे गैरकृत्याचे काम याच संशयिताचे असू शकते, असा संशय व्यक्त केला आहे.

स्वप्निल वाळके खुनाची आठवण झाली जागी !

मडगावातील ज्वेलर स्वप्निल वाळके यांच्यावरही काही वर्षापुर्वी भरदिवसा जीवघेणा हल्ला करण्यात आला होता आणि त्या हल्ल्यात वाळके हा मृत्यूमुखी पडला होता. वाळके खून खटल्याचा निकाल अजून लागलेला नाही. आता कुणाल रायकर यांच्या या नव्या घटनेने वाळके यांच्या खुनाची आठवण जागी झाली.

Advertisement
Tags :

.