sangli Crime : घाणंदमध्ये 27 वर्षीय शेतकऱ्याचे अपहरण; सहा जणांवर गुन्हा दाखल
आटपाडी तालुक्यात भरदिवसा अपहरण आणि मारहाण
आटपाडी : घाणंद (ता. आटपाडी) येथील २७वर्षीय शेतकरी सचिन मधुकर माने याचे फोनवरून झालेल्या वादातून अपहरण आणि मारहाणीची घटना मंगळवारी घडली. या प्रकरणी झरे, लेंगरे, जोंधळखिंडी येथील सहा लोकांवर गुन्हा दाखल केला.
सचिन माने याच्या फिर्यादीवरून अक्षय मोहीते (रा. जोंधळखिंडी), विजय पाटील (रा. झरे), अक्षय खिलारी, तेजस शिंदे, आनंदा काळे व इतर (रा. लेंगरे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय मोहीते याने फोनवरून सचिन माने याला "तु माझ्याविषयी वाईट बोलतोस" असा आरोप करत शिवीगाळ केली. नंतर विजय पाटील यास कॉन्फरन्स कॉलवर घेवून कथित शिवीगाळीबाबत चौकशी केली. त्यानंतर माने झरे-खडसुंडी रोडवरील शिवार हॉटेलजवळ असताना, टोयोटा कंपनीची सिल्व्हर रंगाची गाडी येऊन थांबली.
त्यातून स्वप्नील खिलारी, तेजस शिंदे, तसेच काही अनोळखी व्यक्तींनी जबरदस्तीने सचिन माने याला गाडीत ओढून मारहाण करत अक्षय मोहितेकडे का शिवीगाळ केली, अशी दमबाजी केली. त्यानंतर रेणावी (ता. खानापूर) परिसरातील डोंगरात अक्षय मोहीते, विजय पाटील, आनंदा काळे व इतर लोक उभे असलेल्या ठिकाणी नेऊन पुन्हा शिवीगाळ, मारहाण व जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. पुढे गावातील परिचित सोमनाथ मंडले यांच्या मदतीने तक्रारदारास सोडण्यात आले. तेथून ते सरळ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास आले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.