Sangli Crime : मिरजमध्ये अपहरणाची घटना; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार
बालिकेचे अपहरण करणारा आरोपी पोलिस ठाण्याच्या आवारातून फरार
मिरज : मिरज तालुक्यातील बोलवाड येथे अल्पवयीन बालिकेला फुस लावून तिचे अपहरण करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. बालिकेच्या नातेवाईकांनी तक्रार दिल्यानंतर मिरज ग्रामीण पोलिसांनी तातडीने शोध मोहिम राबवली. अपहरण करणाऱ्या एका संशयिताला ताब्यात घेतले. बालिकेची सुखरुप सुटका केली.
मात्र, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असतानाच संशयित आरोपी नियाज शकील हवालदार (वय २४) हा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारातून पोलिसांच्या हातावर तुरी पळून गेला. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी शोध पत्रक जारी केले आहे. याबाबत माहिती अशी, बुधवारी रात्रीच्या सुमारास तालुक्यातील बोलवाड येथे एका बालिकेचे अपहरण झाले होते. गावातील नियाज हवालदार या तरुणाने फुस लावून बालिकेचे अपहरण केल्याचा संशय होता. पिडीत बालिकेच्या नातेवाईकांनी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिली.
यांनतर पोलिसांनी रातोरात गावात जावून शोध मोहिम राबवली. यातून बालिकेची सुखरुप सुटका करुन अपहरण करणारा संशयित नियाज हवालदारला ताब्यात घेतले. बालिकेला वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करुन संशयीत आरोपीला ग्रामीण गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच संशयीत नियाज हवालदार हा ग्रामीण पोलिस ठाणे आवारातून पळून गेला. यामुळे ग्रामीण पोलिसांच्या एकूणच कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अपहरण प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना तो पळून जातोच कसा? असा सवाल हिंदुत्ववादी संघटनांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, ग्रामीण पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करुन संशयित नियाज हवालदार याच्या शोधासाठी सार्वजनिक शोधपत्रक जारी केले आहे. तसेच पोलिसांची पथके रवाना करुन संशयिताचा शोध सुरू असल्याचे ग्रामीण पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी सांगितले.