गडहिंग्लजला 20 लाखांसाठी अपहरण करुन तरुणास मारहाण! एका महिलेसह दोघांना अटक
गडहिंग्लज प्रतिनिधी
फ्लॅट घेण्यासाठी जमवाजमव केलेल्या रकमेची माहिती असल्याने त्याचेच अपहरण करुन 20 लाखांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन मारहाणीचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. योगेश हरी साळुंखे (वय 34, रा. गर्देनगर, गडहिंग्लज) यांनी याबाबत फिर्याद दिली असून यातील ओंकार दिनकर गायकवाड (रा. हणमंतवाडी), सुनिता ऊर्फ शनया प्रकाश पाटील (रा. बाळेघोल, ता. कागल) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादी योगेश साळुंखे आणि संशयितांमध्ये मित्रत्वाचे नाते आहे. योगेश यांचे मूळ गाव हसुर खुर्द (ता. कागल) असून गडहिंग्लजमध्ये फ्लॅट घेण्यासाठी पैशांची जमवाजमव त्यांनी केली होती. यावर संशयित मित्रांचा डोळा होता. तवंदी मार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवायला जायचे आहे असे सांगून योगेशला गडहिंग्लज येथून ओंकार आणि सुनिता गाडीतून घेऊन गेले. एका हॉटेलनजीक बाथरुमला जातो असे सांगून संशयित दोघे खाली उतरले. त्याचवेळी एक अज्ञात गाडीजवळ आला. 5 जणांच्या मदतीने योगेशचे जबरदस्तीने अपहरण केले. योगेशच्या गळ्यातील अंदाजे 4 तोळ्यांची सोन्याची चेन, दीड तोळ्याची सोन्याची अंगठी काढून घेतली. त्यानंतर त्याला अनोळखी ठिकाणी नेऊन कमरेच्या पट्ट्यांनी, लाथाबुक्क्यानी मारहाण करत 20 लाख रुपये दे नाहीतर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. योगेश याने हा निरोप घरी दिल्यानंतर घरच्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांनी याची माहिती काढत संशयित ओंकार गायकवाड आणि सुनिता ऊर्फ शनया या दोघांना ताब्यात घेतले व योगेशची सुटका केली. योगेशच्या फिर्यादीवरुन ओंकार गायकवाड, सुनिता पाटील यांच्यासह अनोळखी 5 जणांविरुध्द गडहिंग्लज पोलिसात फिर्याद दाखल केली. दोघांना अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास पोलीस निरीक्षक सरगर करत आहेत.