कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खो-खोत महाराष्ट्राचा डबल धमाका

06:45 AM Feb 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

38 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा स्पर्धा, उत्तराखंड : महिला व पुरूष संघाला सुवर्णपदक

Advertisement

वृत्तसंस्था/   हल्दवानी, डेहराडून 

Advertisement

उत्तराखंड येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला व पुरुष खो खो संघाने ओरिसाच्या दोन्ही संघावर मात करत डबल धमाका साधला आहे. महिला व पुरुष संघांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. या विजयासह महाराष्ट्र पदकतालिकेत चौथ्या स्थानी विराजमान झाला आहे.

शनिवारी झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिसावर चूरशीच्या सामन्यात 3 गुणांनी (31-28) असा पराभव केला. मध्यंतराला महाराष्ट्राकडे तीन गुणांची (15-12) आघाडी होती. दुसऱ्या सत्रात ती आघाडी कायम राखण्यात महाराष्ट्राला यश आले. त्यामुळे हा विजय सुकर झाला. विजयी महाराष्ट्रातर्फे प्रियांका इंगळे (1.30, 1.52 मि.  संरक्षण आणि 4 गुण), अश्विनी शिंदे (1.23 मि. संरक्षण व 10 गुण), संध्या सुरवसे (2.24, 2.23 मि. संरक्षण व 2 गुण), रेश्मा राठोड (1.11, 1.45 मि. संरक्षण आणि 4 गुण) यांनी विजयात मोलाची कामगिरी केली.

पुरुष गटात महाराष्ट्राने ओडिसाचा सव्वा सात मिनिटे राखून 6 गुणांनी (32-26) पराभव केला. त्यात महाराष्ट्राच्या रामजी कश्यप (2.20 मि., 1.10 मि. संरक्षण व 2 गुण), सुयश गरगटे (1.10 मि. संरक्षण व 6 गुण), अनिकेत चेंदवणेकर (1 मि. व 2 मि. संरक्षण), प्रतिक वायकर (1 मि. संरक्षण व 6 गुण), शुभम थोरात (1.30 मि., 1.20 मि. संरक्षण आणि 2 गुण) यांनी उत्कृष्ट खेळ केला.

उत्तराखंड येथे सुरू असलेल्या या नॅशनल गेम्समध्ये सर्व खेळात महाराष्ट्रच्या पथकाने चांगली कामगिरी बजावली आहे. खो-खो संघाने सुवर्णमय कामगिरी केल्याबद्दल दोन्ही संघाचे खेळाडू, प्रशिक्षक राजेंद्र साप्ते, पंकज चवंडे यांचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, सचिव प्रा. डॉ. चंद्रजित जाधव यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य आणि खेळाडूंनी अभिनंदन केले आहे.

 सोलापूरच्या ऋतिका श्रीरामला सुवर्ण, ईशा वाघमोडेला कांस्यपदक

डायव्हिंग मधील ‘सुपर मॉम म्हणून ख्याती मिळवलेल्या सोलापूरच्या ऋतिका श्रीराम हिने 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदकांची मालिका कायम ठेवली. तिने 4 मीटर स्प्रिंग बोर्ड या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक तर सोलापूरच्या ईशा वाघमोडे हिने कांस्यपदकाची कमाई केली.

मूळची सोलापूरच्या असलेल्या ऋतिका हिने डायव्हिंग मधील सर्वोत्तम कौशल्याचा प्रत्यय येथे घडविला. तिने 164.75 गुणांची कमाई केली. या क्रीडा प्रकारात सोलापूरच्या ईशा वाघमोडे हिने कांस्यपदक पटकाविले तिने 153.04 गुणांची नोंद केली. येथे तिने याआधी प्लॅटफॉर्म डायव्हिंग मध्ये रौप्य पदक पटकाविले होते

साडेतीन-चार वर्षाचा मुलगा असूनही 34 वर्षीय खेळाडू ऋतिका हिने डायव्हिंग यासारख्या आव्हानात्मक क्रीडा प्रकारात आपले यशस्वी करिअर कायम ठेवले आहे. एकूण 6 राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तिचे हे 11 वे सुवर्णपदक आहे. त्याखेरीज तिने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दोन रौप्य व दोन कांस्यपदके जिंकली आहेत. मुंबई पश्चिम रेल्वेमध्ये नोकरीस असलेल्या ऋतिका हिने आजपर्यंत वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पन्नासहून अधिक पदके जिंकली असून त्यामध्ये तीन डझन पेक्षा जास्त सुवर्णपदकांचा समावेश आहे.

 

नाशिकच्या साईराजला वेटलिफ्टिंगमध्ये कांस्य

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नाशिकच्या साईराज परदेशी याने वेटलिफ्टिंग मधील 81 किलो गटात कांस्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेतील त्याचे पहिलेच पदक होय. एक आठवड्यापूर्वी तापाने आजारी असलेल्या आणि पाठीतील दुखण्याने त्रस्त असलेल्या साईराज याने आज येथे आत्मविश्वासाने कौशल्य दाखविले. साईराज या 17 वर्षीय खेळाडूने स्नॅचमध्ये 141 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 170 किलो असे एकूण 311 किलो वजन उचलले. मध्यप्रदेशच्या व्ही. अजय बाबू याने 322 किलो तर पश्चिम बंगालच्या अचिंता शेऊली याने 313 किलो वजन उचलून अनुक्रमे सुवर्णपदक व रौप्यपदकाची कमाई केली.

स्क्वॅशमध्ये महाराष्ट्राचे दोन्ही संघ अंतिम फेरीत

सुवर्णपदकासाठी दोन्ही संघ तमिळनाडूशी भिडणार

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील स्क्वॅश क्रीडाप्रकारातही महाराष्ट्राने आपले वर्चस्व कायम राखून सांघिक पुरुष व महिला दोन्ही गटात अंतिम फेरीत धडक दिली. रविवारी दोन्ही संघ तामिळनाडूविरूध्द सुवर्णपदकासाठी झुंजतील. महाराणा प्रताप क्रीडा संकुलात सुरू असलेल्या स्क्वॅशमधील उपांत्य लढतीत पुरूष संघाने सेनादलाचा 2-1 पराभव केला. महिला संघाने उत्तरप्रदेशवर 2-1 ने मात करून अंतिम फेरी गाठली.

 

आर्या-रुद्राक्ष जोडीचा रूपेरी वेध

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक विभागात रौप्यपदक जिंकणाऱ्या आर्या बोरसे व रुद्रांक्ष पाटील या महाराष्ट्राच्या जोडीने येथे नेमबाजीमधील 10 मीटर रायफल मिश्र दुहेरीत रौप्यपदक पटकाविले. स्पर्धेत या दोघांचे हे सलग दुसरे रूपेरी यश आहे. महाराणा प्रताप क्रीडा संकुलातील त्रिशूल शूटिंग रेंजवर रंगलेल्या 10 मीटर रायफल मिश्र दुहेरीच्या लढतीत आर्या-रुद्रांक्ष या जोडीने पंजाबच्या ओजस्वी ठाकूर व अर्जुन बबुटा या जोडीला चिवट लढत दिली. मात्र, पंजाबच्या जोडीने महाराष्ट्राच्या जोडीवर 16-12 असा विजय संपादन करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. महाराष्ट्राच्या जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. आर्या हिने याआधी या स्पर्धेतील दहा मीटर एअर रायफलमध्ये रौप्य पदक जिंकले होते. रुद्राक्ष यानेही याच क्रीडा प्रकारात रौप्यपदक पटकाविले होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article