खो खो वर्ल्ड कप स्पर्धा जानेवारीत
यजमान भारतासह जगभरातील 24 संघांचा सहभाग
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येत्या जानेवारीत येथे पहिल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून इंग्लंड, जर्मनी, हॉलंड, अमेरिका यांच्यासह 24 देश त्यात सहभागी होणार आहेत. येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 13 ते 19 जानेवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार असल्याचे राष्ट्रीय खो खो फेडरेशनने शुक्रवारी घोषित केले.
या स्पर्धेत विविध खंडातील संघ सहभागी होणार आहेत. आफ्रिका खंडातून घाना, केनिया, द.आफ्रिका, युगांडा संघ आपली क्षमता दाखवतील. आशिया विभागातून यजमान भारत, बांगलादेश, भूतान, इंडोनेशिया, इराण, मलेशिया, नेपाळ, पाकिस्तान, दक्षिण कोरिया व लंका संघ सहभागी होतील. युरोप खंडातून इंग्लंड, जर्मनी, नेदरलँड्स, पोलंड तर उत्तर अमेरिकेतून कॅनडा व यूएसए आणि दक्षिण अमेरिका विभागातून ब्राझील, पेरू व ओसेनियातून ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या स्पर्धेत सहभागी होतील.
पुरुष व महिला अशा दोन्ही विभागात स्पर्धा होणार असून प्रत्येक विभागात 16 संघ असतील. पुरुष विभागात आफ्रिकन देश घाना, केनिया, दक्षिण आफ्रिका बलाढ्या संघ आहेत. ‘या स्पर्धेच्या माध्यमातून खो खो हा क्रीडा प्रकार फक्त स्थानिक क्रीडा राहणार नसून त्याला वैश्विक स्वरूप प्राप्त होणार आहे. या क्रीडा क्रांतीमध्ये भारत आघाडीवर असून ग्लोबल क्रीडा एकोसिस्टिममध्ये हा खेळ निश्चितच पुढील टप्पा गाठेल,’ अशी आशा केकेएफआयचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी व्यक्त केली आहे. ‘हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगती करीत असल्याचे या स्पर्धेतील 24 संघांच्या सहभागावरून प्रतिबिंबित होत आहे,’ असे केकेएफआयचे सरचिटणीस एमएस त्यागी म्हणाले. खो खो जागतिक खेळ व्हावा, हे आमचे ध्येय असून ते गाठण्यासाठी खो खो वर्ल्ड कप स्पर्धा माईलस्टोन ठरणार आहे, असेही ते म्हणाले.