Karad Politics : हजारमाचीत राष्ट्रवादी गटात खिंडार !
हजारमाचीतील सरपंचसह पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेश
कराड : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या सदाशिवगड विभागातील हजारमाची गावच्या सरपंच निर्मला जिरगे यांच्यासह चार ग्रामपंचायत सदस्य, दोन माजी सरपंच व काही कार्यकर्त्यांनी ऐन निवडणुकांच्या तोंडावर भाजपात प्रवेश केल्याने हजारमाचीतील राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे.
पदाधिकाऱ्यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादी गटातील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भाजपच्या प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी हजारमाचीच्या सरपंच निर्मला जिरगे, सदस्य कल्याणराव डुबल, अवधुत डुबल, पूनम रामुगडे यांच्यासह माजी सरपंच धनाजी माने, मिलिंद सुर्वे, माजी सदस्या संगीता डुबल, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी उपजिल्हाध्यक्ष पराग रामुगडे, वेदांतिका डुबल, सुनील पाटणकर, बबन पाटणकर, संजय डुबल, गजानन सुर्वे, मनोज डुबल, तुषार जाधव, योगशे मगरे, बाळासाहेब पवार, विरवडेचे पै. सतीश डांगे आदी पदाधिकारी वकार्यकर्त्यांनी आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, मंडल अध्यक्ष तुकाराम नलवडे, उपाध्यक्ष निलेश डुबल, राहुल पाटील-पार्लेकर, संभाजी पिसाळ, अमोल पवार, महेश चव्हाण, रणजीत माने, दत्ता शेलार आदींची उपस्थिती होती.