खेलो इंडिया हिवाळी स्पर्धेच्या शुभंकराचे अनावरण
वृत्तसंस्था/ जम्मू काश्मीर
10 ते 14 फेब्रुवारीपासून येथे होणाऱया तिसऱया ‘खेलो इंडिया’ हिवाळी क्रीडा स्पर्धेच्या शुभंकराचे अनावरण शनिवारी येथे केंद्रीय क्रीडा युवजन खात्याचे मंत्री अनुराग ठाकुर तसेच जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे या स्पर्धेचे थिम साँग आणि जर्सीचे अनावरणही करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये देशातील सुमारे 1500 खेळाडू सहभागी होणार आहेत. जम्मू काश्मीरमधील गुलमार्ग येथे ही स्पर्धा घेतली जाणार असून 9 क्रीडा प्रकारांचा यामध्ये समावेश आहे. जम्मू काश्मीरला सदर स्पर्धा भरवण्याची संधी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली असून या परिसरातील क्रीडापटूंना अधिक उत्तेजन आणि प्रोत्साहन मिळावे या हेतूने ही स्पर्धा भरवली जाणार असून ती मोठय़ा प्रमाणात यशस्वी होईल, असे अनुराग ठाकुर यांनी आपल्या संबोधित भाषणात म्हटले आहे. 2020 पासून खलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला होता. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केंद्रीय युवा युवजन खाते तसेच आयोजक जम्मू काश्मीर क्रीडा मंडळ आणि हिवाळी क्रीडा स्पर्धा संघटना यांचे प्रयत्न राहतील. देशातील क्रीडा दर्जा सुधारण्यासाठी क्रीडा युवजन खात्यातर्फे सातत्याने प्रयत्न केले जात असून नजीकच्या भविष्य काळात आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात भारत सुपर पॉवर बनेल, असा विश्वास ठाकुर यांनी व्यक्त केला.