For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सात्विक-चिरागला खेलरत्न, मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार

06:59 AM Dec 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
सात्विक चिरागला खेलरत्न  मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार
Advertisement

साताऱ्याची तिरंदाज आदिती स्वामी व नागपूरच्या ओजस देवताळेचा अर्जुन अवॉर्डने होणार गौरव :

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाने यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली आहे. सर्वात प्रतिष्ठेचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा यंदाच्या वर्षात पुरुष दुहेरी बॅडमिंटनमध्ये शानदार कामगिरी साकारणाऱ्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीला मिळाला आहे. तर आयसीसी वर्ल्डकप गाजवणाऱ्या  मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे,  शमीसह साताऱ्याची महिला तिरंदाज आदिती स्वामी व नागपूरचा युवा तिरंदाज ओजस देवताळे यांच्यासह 26 जणांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समारंभ हा राष्ट्रपती भवन येथे 9 जानेवारी 2024 ला होणार असून राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त खेळाडूंना सन्मानित करण्यात येणार आहे.

Advertisement

क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मेजर ध्यानचंद खेलरत्न हा भारताच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे. तर अर्जुन हा क्रीडा क्षेत्रातील दुसरा सर्वात मोठा पुरस्कार आहे. या दोन मोठ्या भारतीय क्रीडा पुरस्कारांसाठी तिरंदाजी, बॉक्सिंग, कुस्तीपासून पॅरा तिरंदाजी आणि अंध क्रिकेट या 19 विविध खेळांमधील एकूण 28 खेळाडूंना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. तसेच देशातील पाच प्रशिक्षकांना द्रोणाचार्य अवॉर्डने गौरवण्यात येणार आहे. सन्मानित करण्यात येणाऱ्या खेळाडूंची निवड त्यांच्या त्या वर्षातील कामगिरीच्या आधारे केली जाते. क्रीडा विभाग त्याच्या नावाची शिफारस करतो. दरम्यान, क्रीडा मंत्रालयाने यंदाचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार ठरवण्यासाठी 12 सदस्यीय समिती स्थापन केली होती. अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती एएम खानविलकर यांच्यासह हॉकीपटू धनराज पिल्ले, माजी टेबल टेनिसपटू कमलेश मेहता, माजी बॉक्सर अखिल कुमार, महिला नेमबाज सुमा शिरुर, माजी क्रिकेटपटू अंजुम चोप्रा यांचा या समितीत समावेश होता.

बॅडमिंटन स्टार ठरले क्रीडारत्न

यंदाच्या वर्षात बॅडमिंटनमध्ये शानदार कामगिरी करणारे सात्विकसाईराज रंकीरे•ाr आणि चिराग शेट्टी यांची खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 23 वर्षीय सात्विक आणि 26 वर्षीय चिराग यांनी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष दुहेरीत सुवर्णपदक जिंकले होते. या जोडीने 2023 यंदाच्या वर्षात स्विस ओपन, इंडोनेशिया ओपन, कोरिया ओपन आणि चायना मास्टर्सचे विजेतेपद जिंकले आहे. विशेष म्हणजे, जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचणारी भारताची पहिली बॅडमिंटन जोडी होण्याचा मान देखील त्यांनी पटकावला होता. गेल्या वर्षी त्यांनी थॉमस कप जिंकून देत इतिहास रचला. अर्थात, क्रीडा मंत्रालयाने त्यांच्या कामगिरीची दखल घेतली असून प्रतिष्ठित अशा खेलरत्न पुरस्काराने त्यांचा सन्मान केला आहे.

वर्ल्डकप गाजवणारा शमी अर्जुन पुरस्काराचा मानकरी

मोहम्मद शमीने नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार कामगिरी केली. शमीने वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विश्व विक्रम केला. शमी एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला. त्याच्या या कामगिरीची दखल घेऊन बीसीसीआयने शमीच्या नावाची शिफारस केली होती.

साताराची आदिती व नागपूरच्या ओजसचा होणार गौरव

यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी क्रीडा प्रकारात आदिती स्वामी व ओजस देवताळे यांनी शानदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. याशिवाय, यंदाच्या वर्षात या दोघांनी शानदार कामगिरी साकारली आहे. या कामगिरीची क्रीडा मंत्रालयाने दखल घेत दोघांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर केला आहे. दरम्यान, आदितीला पुरस्कार जाहीर होताच राजधानी सातारा येथे मोठा जल्लोष करण्यात आला. नागपूरमध्ये ओजसला अर्जुन अवॉर्ड मिळाल्यानंतर आनंद साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे, आदिती व ओजस यांनी कमी वयात तिरंदाजी मोठे यश संपादन केले आहे.

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार - सात्विकसाईराज व चिराग शेट्टी (बॅडमिंटन)

अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू - मोहम्मद शमी (क्रिकेट), आदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी), ओजस देवताळे (तिरंदाजी), शीतल देवी (पॅरा तिरंदाजी), पारुल चौधरी आणि मुरली श्रीशंकर (अॅथलेटिक्स), मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग), आर वैशाली (बुद्धिबळ), दिव्याकृती सिंग आणि अनुष अग्रवाल (घोडेस्वारी), दीक्षा डागर (गोल्फ), कृष्ण बहादूर पाठक आणि सुशीला चानू (हॉकी), पिंकी (लॉन बॉल), ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर आणि ईशा सिंग (नेमबाजी), अंतिम पांघल आणि सुनील कुमार (कुस्ती), ऐहिका मुखर्जी (टेबल टेनिस), नाओरेम रोशिबिना देवी (वुशू), पवन कुमार आणि रितू नेगी (कब•ाr), नसरीन (खोखो), हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॅश), प्राची यादव (पॅरा कॅनोइंग), अजय कुमार (दृष्टीहीन क्रिकेट).

द्रोणाचार्य पुरस्कार -ललित कुमार (कुस्ती), आर.बी. रमेश (बुद्धिबळ), महावीर प्रसाद सैनी (पॅरा अॅथलेटिक्स), शिवेंद्र सिंग (हॉकी), गणेश प्रभाकर देवरुखकर (मल्लखांब).

Advertisement
Tags :

.