खेड मराठा सेवा संघाचे अध्यक्ष केशवराव भोसले यांचे निधन
खेड / प्रतिनिधी
खेड तालुका मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष व छत्रपती शिवाजी महाराज विद्या प्रसारक मंडळ मुंबई खोपी संस्थेचे जेष्ठ सल्लागार केशवराव जगतराव भोसले (८२) यांचे सोमवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.
1985 मध्ये त्यांनी मराठा महा सेवा संघाच्या माध्यमातून माजी आमदार तू. भा. कदम यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. १९९० मध्ये केशवराव भोसले यांनी रामदास कदम यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. तालुका मराठा सेवा संघाच्या माध्यमातून समाजाला उभारी देण्यासह तरूणांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी अविरतपणे प्रयत्न केले होते. गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी ते नेहमीच अग्रस्थानी होते. खोपी येथे छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची उभारणी करत गरजूंना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे विशेष योगदान होते.
ते शिवसंग्राम संघटनेचे मुंबई प्रदेशचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे माजी सरचिटणीस देखील होते. विविध संघटनांसह स्वयंसेवी संस्थांवर पदाधिकारी म्हणून कार्यरत राहून सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सहकार, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी आगळावेगळा ठसा उमटवला होता. शहरातील शिवाजीनगर येथे मराठा भवनाची अद्ययावत वास्तू उभारत समाजासह स्वयंसेवी संस्थांच्या मनोरंजनात्मक कार्यव मासाठी व्यासपीठच उपलब्ध करून दिले होते.
मराठा समाजाच्या न्यायहक्कासाठी त्यांचा अविरतपणे लढाही सुरू होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी पुकारलेल्या आंदोलनातही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत भूमिकेला अखेरपर्यंत पाठिंबा दिला होता. त्यांचे सर्वच क्षेत्रातील योगदान वाखाणण्याजोगेच आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.