महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खाऊकट्टा गाळे वितरणात नियम धाब्यावर

09:55 AM Nov 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची पत्रकार परिषदेत माहिती : पुन्हा निविदा काढण्यात याव्यात

Advertisement

बेळगाव : खाऊकट्टा गाळे वितरणामध्ये गैरकारभार झाला आहे. योग्य लाभार्थ्यांना वगळून गाळे वितरण करण्यात आले आहेत. याची चौकशी सुरू असून अधिकाऱ्यांकडून लवकरच अहवाल देण्यात येईल. तर खाऊकट्टा गाळे वितरणासाठी पुन्हा निविदा काढण्यात याव्यात, हेच आपले प्रयत्न आहेत. यामध्ये नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे, असे जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. नगरसेवक व इतरांमध्ये वैयक्तिक कारणावरून मारामारी झाली आहे. याचा महानगरपालिका बरखास्त करण्याशी काही संबंध नाही. विनाकारण काँग्रेस पक्षाचे नाव पुढे केले जात आहे, असे त्यांनी सांगितले. खाऊकट्टा येथील गाळे आर्थिक दुर्बलांना वितरण करणे आवश्यक आहे. यामध्ये नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. गोरगरिबांना वगळून आपल्या मर्जीतील  नागरिकांना गाळे वितरण करण्यात आले आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisement

तसेच गाळ्यांचा जाहीर लिलाव करताना याची जाहिरात राज्यस्तरीय वृत्तपत्रामध्ये देणे गरजेचे होते. मात्र, लोकांच्या नजरेस न येणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश नागरिकांना लिलावाची माहितीच नाही. तसेच महानगरपालिकेच्या दोघा नगरसेवकांकडूनही पत्नींच्या नावे गाळे घेण्यात आले आहेत, अशी माहिती सतीश जारकीहोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. नियमानुसार निवडून आल्यानंतर सदर गाळे सोडून देणे आवश्यक आहे. असे न करता संबंधितांनी गाळे आपल्याकडेच ठेवून घेतले आहेत, हे चुकीचे आहे. त्यामुळेच याची चौकशी सुरू आहे. गाळ्यांना 4000 पर्यंत भाडे आहे. मात्र प्रत्यक्षात 15 ते 20 हजार रुपये भाडे आकारले जात आहे. याचीही चौकशी करण्यात येत असल्याचे मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले. खाऊकट्ट्यासह बुडाकडून लिलाव करण्यात आलेल्या भूखंड प्रकरणाचीही चौकशी सुरू आहे. टप्प्याटप्प्याने याचा अहवाल दिल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. हिवाळी अधिवेशनामध्ये उत्तर कर्नाटकातील गंभीर विषयांवर चर्चा होणे आवश्यक आहे. चर्चेतून विकास साधणे शक्य होणार आहे. तर म्हादई योजनेवर केंद्र सरकारकडून स्थगिती आणण्यात आली आहे. हा मुद्दा न्यायप्रविष्ठ असल्याने यावर आपण बोलू शकणार नाही, असे सांगितले. नगरसेवक जवळकर यांना झालेली अटक व सुटका याबाबत पोलिसांकडे पुरावे आहेत. याबाबत पोलीसच योग्य ती चौकशी करतील. याचबरोबर त्यासाठी न्यायालय आहे. तसेच पोलीस प्रशासनावर दबाव आणणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, चिकोडी काँग्रेस जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, राजा सलीम, सुनील हनमण्णावर आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article