खटाव ग्रामसेवक चौकशीत दोषी
सांगली :
मिरज तालुक्यातील खटाव गावचे ग्रामसेवक संजयकुमार गायकवाड चौकशी अहवालात दोषी आढळून आले आहेत. याप्रकरणी त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कारणे दाखवा नोटीस दिली आहे.
दरम्यान ग्रामसेवक संजयकुमार गायवाड यांच्यावर लवकरच निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
संजयकुमार गायकवाड यांना देण्यात आलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, मिरज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडून आलेल्या अहवालानुसार गायकवाड यांनी कामात अनियमितता, कर्त्यव्यामध्ये कसूर केल्याचे दिसत आहे.
ग्रामपंचायतीच्या भरती प्रक्रिया शासन निर्णयानुसार करण्यात आल्याचे दिसत नाही. जनसुविधा व नागरी सुविधा या योजनेतून एकाच कामावर अनेक वेळा खर्च झाल्याचे दिसत आहे, अशा विविध मुद्दांवर सात दिवसांत खुलासा सादर करावा.
मुदतीमध्ये खुलासा प्राप्त न झाल्यास या प्रकरणी आपणास काहीच सांगायचे नाही, असे गृहीत धरून कार्यवाही करण्यात येईल, असे म्हटले आहे.
ग्रामसेवक संजयकुमार गायकवाड यांनी खटाव ग्रामपंचायतच्या कामात अनियमितता केली आहे. त्याबाबतचा चौकशी अहवाल जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडे प्राप्त झाला आहे.
मात्र कारवाईस विलंब केला जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थ परशराम बनसोडे यांनी जिल्हा परिषदेत सीईओ केबीनसमोर अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. या अचानक घडलेल्या प्रकाराने जिल्हा परिषदेत गोंधळ उडाला.
यानंतर संबधित ग्रामसेवकांवरील कारवाईच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. याबाबतचा चौकशी अहवाल तातडीने सादर करण्याची सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांना दिली होती.
चौकशी अहवालात संबधित ग्रामसेवक संजयकुमार गायकवाड दोषी आढळल्याने त्यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार आहे. दोन दिवसात कारवाई होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.