खारी झाल्या मांसाहारी
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात अजब प्रकार
झाडांवर जगणाऱ्या खारींना आम्ही अनेकदा फळं, फुलं अन् पानं खाताना पाहतो. आता या खारी मांसाहारी होत चालल्या आहेत. एकप्रकारे किलर होत आहेत. कॅलिफोर्नियाच्या काही उद्यानांमध्ये हा अजब प्रकार दिसून येत आहे, विशेषकरून कोंट्रा काउंटीच्या स्थानिक पार्कांमध्ये. या निष्पाप दिसणाऱ्या खारी अचानक किलर होतील, अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. या उद्यानांमध्ये सध्या त्यांच्या तोंडात उंदराच्या आकाराचे छोटे जीव ‘वोल’ दिसून येतात. या खारी प्रथम त्यांची निर्दयपणे शिकार करतात, मग त्यांच्या हाडांमधून मांस खेचत फस्त करतात. हे हैराण करणारे परिवर्तन आहे.
वैज्ञानिकांनी अशाप्रकारच्या घटनांना कॅमेऱ्यात कैद केले आहे. विशेषकरून ब्रियोन्स रिजनल पार्कमध्ये. तेथे सध्या वोलचे प्रमाण वाढलेले असून खारी त्यांचीच शिकार करत आहेत. खारींच्या या वर्तनातील बदलाचे अध्ययन करणाऱ्या वैज्ञानिकांचा अहवाल जर्नल ऑफ इथोलॉजीमध्ये प्रकाशित झाला आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ पॅलिफोर्निया आणि युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन-ईयू क्लेयरच्या विद्यार्थ्यांनी 12 वर्षांपासून सातत्याने ब्रियोन्स रीजनल पार्कमध्ये या खारींचे अध्ययन केले. परंतु पहिल्यांदाच यंदा उन्हाळ्यात विद्यार्थ्यांनी काही वेगळे आणि धक्कादायक दृश्य पाहिले. युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन-ईयू क्लेयरचे सहाय्यक प्राध्यापक जेनिफर स्मिथ यांनी एक टीम स्क्वेरल तयार केली, ही टीम खारींच्या हालचालींवर नजर ठेवत आहे.
उंदरांसारख्या जीवावर हल्ला
मांसाहारी खारींच्या कृत्याचे चित्रण करण्यात आले, छायाचित्रे काढण्यात आली, तेथे असलेल्या कॅलिफोर्नियन ग्राउंड खारी शाकाहारी आहेत, या कधी कीडे, अंडी, छोटे पक्षी किंवा उंदरावर हल्ले करत नव्हत्या. परंतु त्यांनी वोलवर हल्ला करण्यास सुरवात केली असता लोकांची त्याकडे नजर गेली. सर्वसाधारणपणे या खारी वोलला पळवत त्याच्या मानेवर किंवा डोक्यावर चावा घेतात, त्यांना पकडतात.
वोलच्या वाढत्या संख्येचे कारण
प्रत्यक्षात या उद्यानात वोलची संख्या वाढली आहे. वोलची संख्या संतुलित राहते, ती वाढत नाही किंवा कमीही होत नाही. परंतु यंदा वोलच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ही वाद मागील 10 वर्षांच्या सरासरीपेक्षा 7 पट अधिक आहे. वोलची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी खारींना हा बदल करावा लागल्याचे वैज्ञानिकांना आढळून आले. वोल हा प्राणी खारींचे अन्न फस्त करत असतो, याचमुळे खारींनी त्यांची शिकार करण्यास सुरुवात केली आहे.
निर्दयपणे शिकार
एक खार एका वोलच्या मागे धावते, अनेकदा यश मिळत नाही, परंतु शिकार पूर्ण निर्दयतेने होते. यानंतर पकडलेल्या वोलचे पहिले शीर खाल्ले जाते. मांस ओरबाडून ओरबाडून खाल्ले जाते. काही खारी पूर्वीच अन्य कुणी केलेल्या शिकारीची चोरी करत असतात.