बेंगळुरातील कार्यक्रमाचे खर्गेंना निमंत्रण
28 नोव्हेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन
बेंगळूर : बेंगळुरातील राजवाडा मैदानावर 28 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आयसीडीएस सुवर्ण महोत्सव, अक्क पथकाचे लोकार्पण आणि गृहलक्ष्मी बहुउद्देशीय सहकार संघाच्या उद्घाटन समारंभासाठी एआयसीसी अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांना महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बालकर यांनी निमंत्रण दिले. बेंगळूरच्या सदाशिवनगर येथील खर्गे यांच्या निवासस्थानी अधिकाऱ्यांसह भेट देऊन या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण पत्र दिले. यानंतर पत्रकारांशी बोलताना हेब्बाळकर म्हणाल्या, आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते राहुल गांधी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्मयता आहे.
या संदर्भात आपण मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी बोलणे केले आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, मंत्री हेब्बाळकर यांनी राजवाडा मैदानमधील कृष्णा विहार येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या कार्यक्रमात 50 हजारांहून अधिक महिला सहभागी होणार असून त्यात कोणतीही त्रुटी राहणार नाही याची काळजी घेण्यात यावी. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या महिला आणि मुलांसाठी योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी महिला आणि बालविकास खात्याच्या प्रधान सचिव डॉ. शामला इक्बाल, संचालक महेश बाबू आणि मंत्र्यांचे विशेष कर्तव्य अधिकारी बी. एच. निस्वल उपस्थित होते.