खंडेनवमी-दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत साहित्य दाखल
बेळगाव : खंडेनवमी व दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत पूजेचे साहित्य दाखल झाले आहे. खंडेनवमीला शस्त्रपूजा केली जाते. आयुध पूजेच्या वेळी ऊस लावून पूजा केली जाते. त्यामुळे मुख्य बाजारपेठेसह सर्वत्र ऊस घेऊन विक्रेते आले आहेत. या दिवशी शिल्पकार, कारागीर, कारखानदार आपापल्या उपकरणांचे, शस्त्रांचे पूजन करतात. उपकरणांना, विविध शस्त्रांना हळद, कुंकू लावून चुन्याची बोटे ओढून झेंडूच्या फुलांनी व माळांनी सजविले जाते. उपकरणांच्या शेजारी ऊस लावले जातात. खंडेचा मूळ शब्द खांडा म्हणजेच खड्ग असा आहे. म्हणून या दिवसाला खंडेनवमी असे नाव पडले आहे. संकटावर मात करून सामर्थ्य प्राप्त व्हावे यासाठी पूजा केली जाते. बाजारपेठेमध्ये उसाबरोबरच झेंडूच्या फुलांच्या राशी, माळा पाहायला मिळतात. नरगुंदकर भावे चौकासह ठिकठिकाणी फुले आणि माळा घेऊन विक्रेते व प्रामुख्याने महिला बसलेल्या दिसतात. सकाळी आणि दुपारनंतर सुरू झालेल्या पावसामुळे त्यांची काहीशी गैरसोय झाली. तरीसुद्धा खरेदी होणार याचा अंदाज बांधून विक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेमध्ये दिसत होते.