धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी खंडाळा तालुका बंद; बहुतांश गावात चांगला प्रतिसाद
लोणंद- धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी देण्यात आलेल्या खंडाळा तालुका बंदला खंडाळावासीयांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला. आज सोमवारी सकाळ पासूनच खंडाळा तालुक्यातील बहुतांश गावातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. लोणंद येथील नगरपंचायत पटांगणावर धनगर समाज एस.टी आरक्षण शिफारशी करिता गेल्या बारा दिवसा पासून गणेश केसकर आमरण उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाची दखल शासन स्तरावर घेत नसल्यान धनगर समाजाने एल्गार पुकारत खंडाळा तालुका बंदची हाक दिली दिली होती.
आज १२ व्या दिवशीही गणेश केसकर यांनी उपोषण सुरूच ठेवले होते. धनगर समाजाने दिलेल्या खंडाळा तालुका बंदच्या केलेल्या आवाहनाला खंडाळा वासियांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. खंडाळा तालुक्यातील लोणंद, अंदोरी, बोरी, पाडेगाव, कोपर्डे, पाडळी, अहिरे, वाघोशी, खेड बुद्रक, निंबोडी, सुखेड, मोर्वे, शेडगेवाडी, बावकलवाडी, पिंपरे बु ॥, बाळूपाटलाचीवाडी, मरिआईचीवाडी, कराडवाडी, आदी गावांमध्ये नागरिकांनी आपली सर्व दुकाने बंद ठेवून बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. परंतु शिरवळ व खंडाळा या ठिकाणी अत्यल्प प्रतिसाद मिळाला.
लोणंद शहरातील सर्व दुकाने स्टॉल टपरी खोकीधारक यांनी आपली दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदवला होता त्यामुळे लोणंद शहरातील नवी पेठ, जुनी पेठ, तानाजी चौक, लक्ष्मीरोड, पुणे- सातारा रोड, शिरवळ रोड, खंडाळा रोड या बाजारपेठा ओस पडल्या होत्या.