Satara News : '... अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेकेदाराविरोधात आंदोलन करु'
रस्ता झाला खड्ड्यांचा, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे समजेना
By : इम्तियाज मुजावर
कोरेगाव : खंडाळा ते शिरोळ या सुमारे 140 किलोमीटर रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून कामानिमित्त संबंधित ठेकेदाराने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर कोरेगांव ते वाठार रस्ता नुसताच खोदून ठेवला आहे. रस्त्यावर पाच ते दहा फुटाचे खड्डे खोदल्याने रस्त्यात खड्डे की रस्त्यात खड्डा हे समजत नसल्याने रोज लहान-मोठ्या अपघातांची मालिकाच सुरु असल्याचे चित्र आहे.
चार दिवसांपूर्वी दुचाकी स्लिप झाल्याने गरोदर महिला गाडीवरून पडली. सुदैवाने महिला बचावली आहे. संबंधित ठेकेदाराच्या नावाने वाहनधारक प्रवास करताना संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. दरम्यान, पीपल्स रिपब्लिकन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश उबाळे यांनी, तुम्ही दहा हजार कोटी रुपये कमवा, परंतु सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळू नका. पावसाळा सुरू होण्यापूर्वी उपाययोजना करा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संबंधित ठेकेदार आणि सरकारविरोधात आंदोलन करु असा इशारा दिला.
यावेळी रमेश उबाळे म्हणाले, दळण-वळणासाठी रस्त्यांचा विकास होणे काळाची गरज आहे. पुणे, खंडाळा, शिरवळ, सांगली, कोल्हापूर येथे एम. आय. डी. सी. आहेत. प्रस्तुत रस्ता प्रमुख शहरांना जोडलेला आहे. संबंधित ठेकेदाराने जितकी यंत्रणा आहे, त्याच प्रमाणात रस्त्याचे काम करणे आवश्यक आहे. परंतु तसे न करता वाठार ते कोरेगाव हा सुमारे पंचवीस ते तीस किलोमीटरचा रस्ता ऐन पावसाळ्याच्या तोंडावर उकरून ठेवला आहे.
साधारण पाच ते दहा फूट रस्ता खोदला असल्याने खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा हे कळायला मार्ग नाही. पाऊस पडल्यावर चालकाला खड्ड्यांतून गाडी कशी चालवावी हा प्रश्न पडत आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालवणे तसेच रस्त्यावर दिशादर्शक फलक नसल्याने चालकांची गैरसोय होत आहे. अन्यथा पावसळ्यापूर्वी किमान खड्डे भरून वाहने चालवता येतील इतकी ठेकेदाराने सोय करावी, अशी मागणी आहे.
चार दिवसांपूर्वी वाहन स्लिप झाल्याने गरोदर महिला पडली सुदैवाने ती बचावली. दररोज रस्त्यावर अशा अपघाताची मालिका सुरूच आहे. सातारा-पंढरपूर रस्त्यावरून प्रवास करत असताना अनेकांना प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे तुम्ही रस्त्याच्या कामात दहा हजार कोटी रुपये कमवा परंतु समान्य लोकांच्या जीवाशी खेळू नका, अन्यथा तुमच्या विरोधात आंदोलन करावे लागेल, असा इशाराही उबाळे यांनी दिला.