तालुक्यात खंडेनवमी पारंपरिक पद्धतीने
वार्ताहर /किणये
तालुक्यात बुधवारी खंडेनवमी सणाला मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने प्रारंभ झाला आहे. शेतकऱ्यांनी आपापल्या घरांमध्ये शेत शिवारातील शस्त्रांची विधिवत पूजा केली. बहुतांशी मंदिरांमध्ये बुधवारी सायंकाळी सामूहिक महाआरती झाली. गुरुवारी तालुक्यात सीमोल्लंघन होऊन या दसरोत्सवाची सांगता होणार आहे. ग्रामीण भागात वेगवेगळ्या पद्धतीने खंडेनवमी साजरी करण्याची परंपरा आहे. तालुक्याच्या विविध गावांमधील मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त पहिल्या दिवशी घटस्थापना करण्यात आली. मंदिरांमध्ये नऊ दिवस विविध आध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रम झाले. बळीराजा शेतशिवारात काम करण्यासाठी व मशागत करण्यासाठी विविध प्रकारची शस्त्रs वापरतो. या शस्त्रांची घरात पूजा करण्यात आली. विद्यार्थीवर्गाने आपल्या शालेय साहित्याच पूजन केले.
तसेच विविध व्यावसायिकांनी आपल्या दैनंदिन जीवनातील वापरात असणाऱ्या मशिनरी व साहित्याचे पूजन केले. उद्यमबाग, मच्छे, नावगे, वाघवडे रोड येथील औद्योगिक वसाहत व कारखान्यांमध्ये खंडी पूजा करण्यात आली. नवरात्र उत्सवात मंदिरांमध्ये भजन, प्रवचन, कीर्तन असे आध्यात्मिक कार्यक्रम झाले. अनेक गावांमध्ये दुर्गामाता मूर्ती पूजविण्यात आलेले आहेत. या ठिकाणी महाआरती व मनोरंजनाचे कार्यक्रम झाले. बेळगुंदी गावात बुधवारी हर हर महादेवाच्या गजरात महाआरती करण्यात आली. बुधवारी दुपारी रवळनाथ मंदिरात आरती करून हक्कदारांनी पुजारी नामदेव गुरव यांच्या डोक्यावर ज्योत ठेवली. त्यानंतर पारंपरिक वाद्यांचा गजर सुरू झाला व हर हर महादेवाच्या गजरात गावातून ही महाआरतीची मिरवणूक काढण्यात आली. या महाआरती सोहळ्याला भाविक सहभागी झाले होते.