For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापूर-रामनगर-अनमोड रस्ताकाम पुन्हा रखडणार

10:40 AM Jun 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
खानापूर रामनगर अनमोड रस्ताकाम पुन्हा रखडणार
Advertisement

कंत्राटदारास पुन्हा सहा महिन्यांची मुदत : पावसाळ्यानंतरच काम पूर्ण होण्याची शक्यता; मुदतीत काम पूर्ण न झाल्यास कंत्राट रद्द करण्याचा इशारा

Advertisement

खानापूर : बेळगाव-गोवा महामार्गाचे खानापूर ते रामनगर-अनमोडपर्यंतचे काम पावसाळ्यापूर्वी होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कंत्राटदार एम. व्ही. म्हात्रे यांना पुन्हा सहा महिन्यात काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. तशाप्रकारची नोटीस त्यांना बजावण्यात आली आहे. त्यामुळे म्हात्रे यांना सहा महिने अवधी मिळाल्याने उर्वरित काम आता पावसाळ्यानंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खानापूर ते अनमोड या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांना पुढील सहा महिने तरी त्रासच सहन करावा लागणार आहे. गेल्या सात वर्षांपासून रामनगर, खानापूर ते तिनईघाट, अनमोडपर्यंतचे काम या ना त्या कारणाने रखडले होते. गेल्यावर्षी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कंत्राटदार बदलून पुणे येथील एम. व्ही. म्हात्रे यांना या रस्त्याचे कंत्राट देण्यात आले होते. तसेच त्यांना मे 2024 पर्यंत काम पूर्ण करण्यासाठी कालावधी देण्यात आला होता. एम. व्ही. म्हात्रे यांनी जलदगतीने काम करणे गरजेचे होते. मात्र ज्या गतीने काम होणे आवश्यक होते. त्या गतीने रस्त्याचे काम झाले नाही. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दुर्लक्ष केल्याने या रस्त्याचे काम रखडले. त्यामुळे या रस्त्यावरील प्रवाशांना पुढील सहा महिने नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. गुंजी ते रामनगरपर्यंतचे काम पूर्णपणे अर्धवट राहिले असून रामनगर ते तिनईघाटपर्यंतचेही काम अर्धवट अवस्थेत आहे. परिणामी प्रवाशांना पर्यायी रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.

डिसेंबर 24 पर्यंत काम पूर्ण करण्याची नोटीस

Advertisement

गुंजी येथील माउली मंदिरासमोरील मागील बाजूस जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्णपणे थांबलेले असल्याने रवळनाथ मंदिराच्या शेजारून जुन्याच रस्त्याने सध्या वाहतूक होत आहे. त्यामुळे माउली मंदिर आणि रवळनाथ मंदिरमधील रस्त्यावर अनेकवेळा वाहन चुकीच्या रस्त्यावर गेल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच लोंढा ते तिनईघाटपर्यंत बाहेरून काढलेल्या नव्या रस्त्याचे काम पूर्णपणे अर्धवट अवस्थेत राहिल्याने या ठिकाणीही प्रवाशांना  नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या संपूर्ण रस्त्याचे काम तातडीने करणे आवश्यक होते. मात्र रस्त्याचे काम झालेले नसल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने म्हात्रे यांना सहा महिन्याच्या कालावधीची नोटीस दिली असून पुढील काम डिसेंबर 24 पर्यंत पूर्ण करण्याचे नोटिसीत बजावण्यात आले आहे. अन्यथा कंत्राटदार रद्द करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रवाशांना पर्यायी रस्त्यावरूनच प्रवास करावा लागणार

अधिकाऱ्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले की, त्यामुळे डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र पावसाळ्dयात चार महिने काम होणार नसल्याचे आता स्पष्ट आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यातही हे काम होणार नसल्याने प्रवाशांना पर्यायी रस्त्यावरूनच प्रवास करावा लागणार आहे. तसेच या पर्यायी रस्त्यांच्या वापरामुळे अनेकवेळा वाहतुकीची कोंडी होत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वेळोवेळी अपघातही होत आहेत. या भागातील ग्रामीण जनतेलाही गेल्या आठ वर्षांपासून रस्त्याच्या खाळंबलेल्या कामामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे हे काम रखडले आहे. कंत्राटदाराला यापूर्वीच नोटीस बजावून वेळेत काम करण्याची सूचना केली असती तर निश्चित हे काम पूर्णत्वास आले असते. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेही याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

खानापूर-अनमोड रस्त्याच्या दर्जाबाबत नागरिकांतून असमाधान

या भागातील नागरिकांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले की, ज्या तत्परतेने टोलनाका सुरू करण्यास अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस बैठका घेऊन टोल सुरू केला. त्याप्रमाणे मात्र खानापूर ते अनमोड रस्त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवलेली नाही. त्यामुळे खानापूर ते अनमोड रस्त्यापर्यंतच्या दर्जाबाबत प्रवासी व नागरिकांतून असमाधान व्यक्त होत आहे. बेळगाव-खानापूर रस्ता ज्या पद्धतीने झालेला आहे. त्याच पद्धतीने खानापूर-तिनईघाट रस्ताकाम झालेला नसल्याचेही यावेळी प्रवाशांतून सांगण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गांभीर्याने लक्ष घालून निदान डिसेंबरपूर्वी तरी या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.