खानापूर गणेश महामंडळाने दिला डिजेला फाटा
बॅन्ड, झांजपथकासह पारंपरिक वाद्यात विसर्जन मिरवणूक उत्साहात : पोलिसांकडूनही कौतुक
खानापूर : शहरातील सार्वजनिक गणपतींचे विसर्जन यावर्षी आगळ्यावेगळ्या आणि पारंपरिक तसेच धार्मिक संस्कृतीची जपणूक करत विसर्जन करण्यात आले. त्यामुळे शहरातील नागरिकांनी या विसर्जन मिरवणुकीचा आनंद लुटला. डिजेला फाटा दिल्याने डिजेचा गोंगाट आणि डिजेच्या गाण्यावर थिरकणारी तरुणाई अभंग आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर ताल धरुन नाचत होती. त्यामुळे गणपती विसर्जनाला आगळे वेगळे स्वरुप प्राप्त झाले होते. पोलीस प्रशासनानेही याचे कौतुक केले आहे.
खानापूर शहरातील गणेश महामंडळाचे अध्यक्ष पंडित ओगले यांनी आवाहन केल्याप्रमाणे शहरातील गणेश मंडळांनी डिजेला फाटा देऊन पारंपरिक बॅण्ड, भजनी मंडळ तसेच सांप्रदायिक भजन, लेझीम, झांजपथक, गवळी वाद्य तसेच सनई वाद्यात गणपतींचे विसर्जन करण्यात आले. यात महालक्ष्मी सार्वजनिक गणेश मंडळाने पारंपरिक वाद्ये तसेच गोव्यातील सजीव देखाव्यांद्वारे गणपती मिरवणुकीत सहभागी झाल्याने मोठे आकर्षण बनले होते.
सजीव गणपती देखाव्याचे आकर्षण
रात्री उशिरापर्यंत चाललेल्या मिरवणुकीत शहरातील नागरिकांनी या सजीव गणेशाचा आनंद लुटला. तर बाजारपेठ, विद्यानगर गणेश मंडळाने, रेल्वेस्टेशन आणि देसाई गल्ली महाराष्ट्र युवक मंडळ, बाजारपेठ गणेश मंडळ, केंचापूर गल्ली, चौराशी गणेशोत्सव मंडळ, दुर्गानगर गणेश मंडळ, बाल गणेश मंडळ यांनी पारंपरिक वाद्यात विसर्जन मिरवणूक काढली. त्यामुळे यावर्षीच्या विसर्जन मिरवणुकीत डिजेचा गोंगाट अजिबात नसल्याने विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत सर्वच रस्त्यांवर गणेशभक्तांची गर्दी
शहरातील सार्वजनिक विसर्जन पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत सर्वच रस्ते गणेशभक्तांनी फुलून गेले होते. यावर्षी सर्वच गणेश उत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती अत्यंत आकर्षक आणि सुबक होत्या. गेल्या दहा दिवसात सर्वच मंडळांनी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. प्रत्येक मंडळाने यावर्षी महाप्रसादाचे आयोजन केले होते. पावसानेही उघडीप दिल्याने गणपती पाहण्यासाठी नागरिकांची रात्री उशिरापर्यंत गर्दी होत होती.