खानापूरचे शिक्षणाधिकारी पी.रामप्पा यांची ‘लोककल्प’ला भेट
शैक्षणिक विकासासाठी फौंडेशनच्या उपक्रमांचे कौतुक
बेळगाव : खानापूर तालुक्याचे शिक्षणाधिकारी (बीईओ) पी. रामप्पा व कणकुंबी शिक्षण विभागाचे अध्यक्ष जीवन पाटील यांनी लोककल्प फौंडेशन शॉपला भेट देऊन शिक्षण क्षेत्रात फौंडेशनने राबविलेल्या उल्लेखनीय उपक्रमांचे कौतुक केले. फौंडेशनने खानापूर तालुक्यातील 32 दत्तक गावांमध्ये शैक्षणिक उन्नतीसाठी ग्रामीण शाळांना बेंच, ग्रीन बोर्ड, स्टडी टेबल, स्मार्ट टीव्ही, संगणक आणि पाणी पिण्याचे फिल्टर यांसारख्या अत्यावश्यक शैक्षणिक साधनांची उपलब्धता करून ग्रामीण शिक्षणात सकारात्मक बदल घडवित आहेत. रामप्पा यांनी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.चे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण, आरोग्य, रेजगार व पायाभूत सुविधा या क्षेत्रात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचेही कौतुक केले. तसेच व्यवस्थापक (सीएसआर) मालिनी बळी आणि त्यांच्या टीमचे ग्रामीण भागातील योगदानाबद्दल अभिनंदन केले. या भेटीमुळे शिक्षण विभाग आणि लोककल्प फौंडेशन यांच्यातील सहकार्याची भावना अधिक दृढ झाली असून, ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याचा निर्धार करण्यात आला.