खानापूर शहरासह तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात
खानापूर : स्वातंत्र्याची फळे शेवटच्या माणसापर्यंत पोहचणे गरजेचे आहे. यासाठीच लोकप्रतिनिधींचे काम आहे. खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील ग्रामस्थांना स्वातंत्र्य मिळवून 78 वर्षे झाली तरी त्यांना स्वातंत्र्याची फळे चाखता आली नाहीत. त्यामुळे या ग्रामस्थांना मुलभूत सुविधा देण्यासाठी जे काही करता येईल त्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. त्यांना सामाजिक जीवनाच्या नित्य प्रवाहात आणण्यासाठी जे काही करता येणे शक्य आहे. त्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न राहतील, असे विचार आमदार विठ्ठल हलगेकर यांनी तहसीलदार कार्यालयाच्या आवारात 78 वा सार्वजनिक स्वातंत्र्य दिन सोहळ्यात व्यक्त केले. प्रारंभी महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. उपस्थितांनी तिरंगा झेंड्याला मानवंदना दिली. यावेळी तहसीलदार प्रकाश गायकवाड म्हणाले, स्वातंत्र्यानंतर देशात आमूलाग्र बदल झाला आहे. लोकशाहीत प्रत्येकाच्या हिताचाच विचार करण्यात येतो.
लोकशाहीच्या आणि घटनेने दिलेल्या अधिकारातून देशात सर्वांना न्याय आणि अधिकार देण्यात आलेला आहे. स्वातंत्र्याच्या अधिकारामुळे सर्वसामान्यांची प्रगती झालेली आहे, असे ते म्हणाले. यावेळी तालुक्यातील विविध क्षेत्रात उत्तुंग यश प्राप्त केलेल्यांचा गौरव करण्यात आला. तालुक्यात जलसमृद्धीच्या माध्यमातून प्रत्येक तलावाच्या काठावर झेंडावंदन करण्यात आले. या ठिकाणी स्थानिक जवानांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच तालुक्यातील सर्वच शाळा, शासकीय कार्यालये संघ, संस्था यांच्या कार्यालयातील झेंडावंदन उत्साहात पार पडले. सकाळी 7 वाजल्यापासूनच झेंडांवदनासाठी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी शाळेत, कार्यालयात दाखल झाले होते. शाळेचे पटांगण रांगोळ्यानी व पताक्यानी सुशोभित करण्यात आले होते. मात्र ऐनवेळी सकाळी 8 वाजता जोरदार पावसाने झोडपल्याने अनेकांचा हिरमोड झाला. तरीही स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक गावात प्रभातफेरी काढून नंतर ग्राम पंचायतीच्या कार्यालयासमोर आणि शाळेत पटांगणात ध्वजारोहण करण्यात आले. कृषी खाते, शासकीय दवाखाना, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, पशू वैद्यकीय खाते, बालसंगोपण खाते, रेल्वेस्थानक, पोस्ट कार्यालय, पोलीस स्टेशन, नगरपंचायत यासह इतर शासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.