For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राहुल गांधींना खलिस्तानवाद्यांचा पाठिंबा

06:39 AM Sep 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
राहुल गांधींना खलिस्तानवाद्यांचा पाठिंबा
Advertisement

शीखांवर भारतात अन्याय होत असल्यानेच स्वतंत्र ‘खलिस्तान’ची मागणी : पन्नूचे वक्तव्य

Advertisement

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन

भारतात शीखांवर अन्याय होत असल्याचे राहुल गांधींचे विधान योग्य असून अशा अन्यायामुळेच आम्ही स्वतंत्र खलिस्तान राष्ट्रासाठी आंदोलन करीत आहोत, असे वक्तव्य अमेरिकेतील खलिस्तानवादी आणि ‘जस्टीस फॉर शीख’ या फुटीरतावादी संघटनेचा नेता गुरुपतवंतसिंग पन्नू याने पेले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी शीखांसंबंधी केलेले विधान भारत तोडू पाहणाऱ्या खलिस्तानवाद्यांच्या पथ्यावर पडणार अशी चिन्हे दिसत आहेत. एकंदर, गांधींचा अमेरिका दौरा चांगलाच वादग्रस्त ठरणार असे दिसत असून त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या हाती काँग्रेसच्या विरोधात आयते कोलित मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement

भारतात शीखांना पगडी घालता येते का, त्यांना कडे परिधान करता येते का, आणि ते गुरुद्वारांमध्ये जाऊ शकतात का, हा प्रश्न असून त्यासाठीच आमचा संघर्ष होत आहे, असे विधान राहुल गांधी यांनी मंगळवारी केले होते. याचा विधानाचा लाभ खलिस्तानवादी उठवताना दिसत आहेत. शीखांना भारतात त्यांच्या धर्माचे योग्य प्रकारे आचरण करणे कठीण आहे, हे राहुल गांधींच्या विधानावरुन स्पष्ट होत आहे. हा शीखांवरील अन्याय दूर करण्यासाठी आम्ही शीखांसाठी स्वतंत्र राष्ट्राची मागणी करीत आहोत, हे गुरुपतवंतसिंग पन्नू याचे विधान आहे.

भाजप नेत्यांचा हल्लाबोल

राहुल गांधी विदेशी भूमीवर भारतविरोधी विधाने करुन भारताला कमजोर करण्याचे काम करीत आहेत. परदेशात भारतविरोधी वक्तव्ये करणे हा जणू त्यांचा  आणि त्यांच्या पक्षाचा धंदाच बनला आहे. तथापि, जोपर्यंत भारतीय जनता पक्ष आहे. तोपर्यंत देशाच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला कोणताही धक्का लागू दिला जाणार नाही. तसेच दलित आणि अन्य समुदायांना दिले गेले आरक्षणही समाप्त होणार नाही, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे.

मनातील विचार उघड झाले

राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष यांच्या मनात नेमके काय चाललेले आहे, हे त्यांच्या वक्तव्यांमधून कोणत्या ना कोणत्या निमित्ताने बाहेर येते. त्यांचे विचार अत्यंत आक्षेपार्ह आहेत. ते संदर्भहीन आणि कोणताही पुरावा नसलेली बिनबुडाची वक्तव्ये करुन नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांच्या स्वैर वक्तव्यांमुळे देशाची अवमानना होते, अशा अर्थाची टीका शहा यांनी केली.

राजनाथसिंग यांचेही शरसंधान

गांधी यांची विधाने तथ्यहीन, असत्य आणि पायाहीन आहेत. भारताने नेहमीच शीख समुदायाला सन्मान दिला असून या समुदायाने भारताच्या संस्कृतीत केलेल्या भरीव योगदानाची नोंद घेतली आहे. राहुल गांधी यांनी दलित, आदीवासी आणि अन्य मागासवर्गियांच्या आरक्षणासंबंधी केलेली वक्तव्ये समाजात फूट पाडणारी आहेत. राजकीय स्वार्थासाठी ते धडधडीत खोटी विधाने करीत असून जनता त्यांचे डावपेच हाणून पाडल्याखेरीज राहणार नाही, असा पलटवार सिंग यांनी केला.

मालवीय, गोयल यांच्याकडूनही समाचार

भारतीय जनता पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान कक्षाचे प्रमुख अमित मालवीय आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही गांधी यांच्या विधानांचा समाचार घेतला आहे. विदेशात जाऊन अशा प्रकारची विधाने करुन ते देशविघातक शक्तींनाच पाठबळ देत आहेत. त्यांची कृती देशहिताची नाही, अशी टीका या नेत्यांनी केली.

चीनने दिल्लीएवढी भूमी बळकावली

गांधी यांचे आणखी एक विधान त्यांना वादाच्या भोवऱ्यात ढकलण्याची शक्यता आहे. चीनने लडाख परिसरात भारताची दिल्लीच्या क्षेत्रफळाएवढी भूमी गेल्या काही वर्षांमध्ये बळकावली आहे, असा आरोप त्यांनी एका कार्यक्रमात केला. चीन आणि भारत यांच्या सेना एकमेकींच्या डोळ्याला डोळा भिडवून लडाख क्षेत्रात गेल्या तीन वर्षांपासून उभ्या आहेत. सीमेवर अघोषित तणाव आहे. चीनशी होत असलेल्या या नव्या संघर्षात भारताने आपली एक इंचही भूमी गमावलेली नाही, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताच्या सेनेनेही अधिकृतरित्या केलेले आहे. तरीही राहुल गांधी विदेशात जाऊन भारताने भूमी गमावली असल्याचा दावा करतात. ही त्यांची कृती अत्यंत अयोग्य असून ती सेनेच्या मनोधैर्यावर आघात करणारी आहे, अशी टीका होत आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनीही गांधी यांच्या भारत-चीन संघर्षासंबंधातील या बेजबाबदार वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे.

भारतविरोधी ओमर यांच्याशी भेट ?

अमेरिकेच्या पाकिस्तानवादी आणि भारतविरोधी लोकप्रतिनिधी इलहान ओमर यांचीही भेट राहुल गांधी यांनी घेतल्याचा आरोप केला जात आहे. ओमर यांच्यासह गांधींचे एक छायाचित्रही प्रसिद्ध झाले आहे. ओमर या डेमॉव्रेटिक पक्षाच्या सदस्या आहेत. त्यांनी भारतात अल्पसंख्याकांच्या धार्मिक अधिकारांची पायमल्ली होत आहे, असा प्रस्ताव अमेरिकन लोकप्रतिनिधीगृहात 2022 मध्ये आणला होता. तसेच काश्मीरवर भारताचा बेकायदेशीर कब्जा आहे, असे विधानही त्यांनी केले होते. त्या त्यांच्या भारतविरोधी विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे राहुल गांधी यांच्यासह छायाचित्र हे कशाचे निर्देशक आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. सोशल मिडीयावरही गांधी यांच्या विधानांवर आक्षेप घेतले जात आहेत.

  • वादग्रस्त विधानांची मालिकाच
  • राहुल गांधी यांच्याकडून अमेरिका दौऱ्यात वादग्रस्त विधानांची मालिका
  • भारतीय जनता पक्षनेत्यांकडून राहुल गांधी यांच्यावर धारदार प्रतिहल्ला
  • विविध क्षेत्रांमधील तज्ञ आणि सोशल मिडियावरही विधानांसंबंधी टीका
Advertisement
Tags :

.