खलिस्तानवादी अमृतपाल लोकसभेच्या रिंगणात
खडूर साहिब मतदारसंघातून लढणार
वृत्तसंस्था/ अमृतसर
खलिस्तान समर्थक फुटीरतावादी आणि वारिस पंजाब डेचा प्रमुख अमृतपाल सिंग अपक्ष उमेदवार म्हणून खडूर साहिब लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. अमृतपालची आई बलविंदर कौर हिने यासंदर्भात माहिती दिली आहे. अमृतपाल सिंग याला गेल्यावषी एप्रिलमध्ये अटक करण्यात आली होती. त्याच्यावर कठोर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) लागू करण्यात आला होता. अमृतपालसह त्याचे नऊ साथीदार सध्या आसाममधील दिब्रुगड तुऊंगात बंद आहेत.
लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अमृतपालवर दबाव आणला जात होता. त्यामुळेच आपला पुत्र आता राजकीय इनिंगला सुऊवात करणार असल्याचे अमृतपाल सिंग याच्या आई बलविंदर यांनी सांगितले. अमृतपाल ही निवडणूक कोणत्याही पक्षाच्या व्यासपीठावर लढणार नाही. त्याला पंजाबच्या प्रश्नांची चांगली जाण असल्याने त्याच मुद्यांवर अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली जाईल, असेही तिने सांगितले.
अमृतपाल सिंग यांचे वडील तरसेम सिंग यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे वृत्त फेटाळल्यानंतर एक दिवसानंतर त्याच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर पुन्हा वडील तरसेम सिंग यांनी स्पष्टीकरण देताना अद्याप काहीही निश्चित झालेले नाही आणि निवडणूक लढवण्याचा निर्णय स्थानिक लोकांनी घ्यावा, असे म्हटले आहे. जर जनतेची इच्छा असेल तर अमृतपाल सिंग निवडणूक लढवेल असे ते पुढे म्हणाले. अमृतपालला निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, पण लोकांची इच्छा असेल तर तो रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.