मंदिर परिसरात खलिस्तानींना मज्जाव
कॅनडाच्या न्यायालयाचा पोलिसांना आदेश
वृत्तसंस्था/ टोरंटो
कॅनडात खलिस्तान समर्थकांना मिळणाऱ्या मुक्तहस्तादरम्यान एका न्यायालयाने दिलासा देणारा निर्णय दिला आहे. टोरंटोच्या स्कारब्रॉ येथील लक्ष्मीनारायण मंदिराच्या याचिकेवर आंsटारियोच्या न्यायालयाने मंदिर कॉन्सुलर कॅम्पदरम्यान 100 मीटरच्या कक्षेत विनाअनुमती प्रवेश करण्यास बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. यामुळे मंदिरात कुणालाच अनुमतीशिवाय प्रवेश करता येणार नाही.
परिसराच्या 100 मीटरच्या कक्षेत समाजकंटक पोहोचू नयेत अशी मंदिराची मागणी आहे आणि याकरता बंदीची गरज आहे. मागील घटना पाहता मंदिराला संबंधित नियम लागू करण्याची अनुमती दिली जाते. मंदिरावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर कॉन्सुलर कॅम्पमध्ये वृद्ध लोक येत असल्याने हल्ला झाल्यास जीवितहानी होऊ शकते असे सुपीरियल कोर्ट ऑफ जस्टिसच्या न्यायाधीशांनी म्हटले आहे.
बंदी लागू न करण्यास आल्यास मोठी हानी होऊ शकते. मंदिरात जर कुणी अनुमतीशिवाय प्रवेश केला तर त्याला अटक केली जावी आणि कारवाई करण्यात यावी असा आदेश न्यायालयाने टोरंटो पोलिसांना दिला आहे. मंदिर परिसरात आयोजित होणाऱ्या कॉन्सुलर कॅम्पला यापूर्वी खलिस्तान समर्थकांनी लक्ष्य केले होते.
खलिस्तान समर्थक भारतीय दूतावासाच्या कार्यक्रमांना विरोध करत आहेत. आगामी काळात भारतीय दूतावास कॅनडात कॉन्सुलर कॅम्प आयोजित करणार आहे. लक्ष्मीनारायण मंदिरासोबत सूरीमध्येही कॅम्प आयोजित होईल. मागील आठवड्यात या कॅम्पच आयोजन केले जाणार होते, परंतु सुरक्षेअभावी अन् खलिस्तान समर्थकांच्या हल्ल्यांमुळे ते रद्द करण्यात आले होते. 3 नोव्हेंबर रोजी ब्रॅम्पटन येथील हिंदू सभा मंदिरात खलिस्तान समर्थकांनी हल्ला केला होता.