ट्रंप येण्यापूर्वी अमेरिकेत परत या !
सुटीवर गेलेल्या विदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकेतील विद्यापीठांनी केले महत्वाचे आवाहन
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
हिंवाळी सुटी घालविण्यासाठी मायदेशी गेलेल्या सर्व विदेशी विद्यार्थ्यांनी डोनाल्ड ट्रंप यांचा शपथविधी होण्यापूर्वी अमेरिकेत परतावे, असे आवाहन अमेरिकेतील अनेक विद्यापीठांनी केले आहे. हे आवाहन भारतीय विद्यार्थ्यांनाही लागू आहे. येत्या 20 जानेवारीला ट्रंप अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. अधिकृतरित्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ते कदाचित विदेशी नागरीकांसाठी ‘प्रवास बंदी’ (ट्रॅव्हल बॅन) लागू करतील. त्यांनी तसे केल्यास अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या आणि हिंवाळी सुटीसाठी आपापल्या देशांमध्ये गेलेल्या विदेशी विद्यार्थ्यांची कोंडी होऊ शकते. त्यामुळे त्यांनी 20 जानेवारीपूर्वीच अमेरिकेत परत यावे, असा संदेश देण्यात आला आहे.
अमेरिकेत बेकायदा प्रवेश केलेल्या स्थलांतरीतांची त्यांच्या देशांमध्ये परतपाठवणी केली जाईल. ही परतपाठवणी इतिहासातील सर्वात मोठी असेल, असे धोरण डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार करत असताना अनेकदा केले होते. त्यामुळे या प्रस्तावित धोरणाचे क्रियान्वयन ते अध्यक्ष झाल्यानंतर त्वरित करु शकतात. त्यांनी प्रवासबंदी आदेश काढला किंवा अमेरिकेतील विमानतळांवर विदेशी प्रवाशांच्या पडताळणीचे कठोर नियम लागू केले, तर मायदेशांमध्ये सुटीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांची मोठी अडचण होऊ शकते. ही संभाव्य अडचण विचारात घेऊन अशा विद्यार्थ्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे.
20 जानेवारीच्या आधीच या
जरी ट्रंप यांचा शपथविधी 20 जानेवारीला होणार असला तरी, जानेवारीच्या प्रथम सप्ताहानंतर अमेरिकेत सुरक्षा नियम कठोर केले जातील. त्यामुळे त्यानंतर अमेरिकेत परत येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची कोंडी होऊ शकते. त्यामुळे त्यांनी जानेवारी महिन्याचा प्रारंभ होण्यापूर्वीच अमेरिकेत यावे, अशीही सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थीही सावध झाले होतील अशी शक्यता आहे
मागच्या वेळेचा अनुभव
2016 मध्ये ट्रंप यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती. त्यानंतरही अमेरिकेत येणाऱ्यांसाठी कठोर प्रवासनियम लागू करण्यात आले होते. त्यावेळी मायदेशी गेलेल्या अनेक विदेशी विद्यार्थ्यांची अडचण झाली होती. तो अनुभव लक्षात घेऊन आम्ही हे आवाहन करीत आहोत, असे प्रतिपादन मॅसेच्युसेट्स् विद्यापीठाच्या प्रशासनाने केले आहे. अन्य अनेक विद्यापीठांच्या प्रशासनांनीही अशीच वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे या आवाहनाचे गांभीर्य वाढले आहे.
काय होईल सांगता येत नाही
अमेरिकेच्या विद्यापीठांमध्ये अधिकृरित्या आणि रीतसर प्रवेश घेतलेला विद्यार्थी कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित असतो. कारण तो बेकायदेशीर स्थलांतरीत नसतो. तसेच त्याने विद्यापीठाचे शुल्क भरलेले असते आणि त्याला शिक्षण घेण्यापासून रोखले जाऊ शकत नाही. तथापि डोनाल्ड ट्रंप अध्यक्ष झाल्यानंतर नियमांमध्ये कोणते परिवर्तन केले जाईल, याविषयी सध्या काही अनुमान व्यक्त करणे कठीण आहे. नव्या अध्यक्षांची धोरणे त्यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतरच स्पष्ट होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी धोका पत्करु नये, एवढ्यासाठी हे आवाहन केल्याचे अमेरिकेतील विद्यापीठांमधल्या काही प्राध्यापकांनी स्पष्ट केले आहे.