कॅनडात खलिस्तानींचा हिंदू मंदिरावर हल्ला
भाविकांवर लाठीमार : कॅनडा सरकारने कारवाई करण्याची भारताची मागणी
वृत्तसंस्था/ ओटावा
कॅनडातील ब्रॅम्प्टनमध्ये रविवारी खलिस्तानी समर्थकांनी हिंदू सभा मंदिरात आलेल्या भाविकांना मारहाण करण्यासोबतच मंदिरावर हल्ला केला. हल्लेखोरांच्या हातात खलिस्तानी झेंडे होते. त्यांनी मंदिरात उपस्थित लोकांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून भाविकांना बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून भारताने याबाबत आवाज उठविला आहे. कॅनडा सरकारने तातडीने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी भारताने केली आहे.
ब्रॅम्प्टनमध्ये हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पील प्रादेशिक पोलीस प्रमुख निशान दुराईप्पा यांनी जनतेला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच या घटनेचा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी निषेध केला आहे. ब्रॅम्प्टनमधील हिंदू सभा मंदिरात घडलेली हिंसाचाराची घटना अयोग्य आहे. प्रत्येक पॅनेडियनला त्याचा धर्म मुक्तपणे आणि सुरक्षितपणे पाळण्याचा अधिकार आहे, असे ते सोशल मीडियावर म्हणाले. काही काळापासून कॅनडातील हिंदू मंदिरे आणि समुदायातील सदस्यांना लक्ष्य केल्याने भारतीय समुदाय चिंतेत आहे. गेल्या काही वर्षांत ग्रेटर टोरंटो एरिया, ब्रिटिश कोलंबिया आणि कॅनडात इतरत्र हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आली आहे.
कॅनडाच्या सरकारने प्रार्थनास्थळांचे संरक्षण करावे : परराष्ट्र मंत्रालय
कॅनडातील एका हिंदू मंदिराची तोडफोड आणि हल्ल्याच्या घटनेवर भारतानेही चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी ही माहिती दिली आहे. ‘हिंदू सभा मंदिरात कट्टरतावादी आणि फुटीरतावाद्यांनी केलेल्या हिंसाचाराचा आम्ही निषेध करतो. आम्ही कॅनडा सरकारला अशा सर्व प्रार्थनास्थळांचे संरक्षण करण्याचे आवाहन करतो. या हल्ल्यात सहभागी असलेल्यांना शिक्षा करावी, असे जायस्वाल म्हणाले.
ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तांनीही याबाबत एक निवेदन जारी केले आहे. टोरंटोजवळील ब्रॅम्प्टन येथील हिंदू सभा मंदिरात भारतविरोधकांनी हिंसाचार घडवून आणल्याचे भारतीय उच्चायुक्तांनी सांगितले. भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत आम्ही अत्यंत चिंतित आहोत. कॅनडातील हिंदू मंदिरांवर झालेल्या हल्ल्याचा केंद्रीय मंत्री रणवीर सिंह बिट्टू यांनीही निषेध केला आहे. तसेच कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो यांनी लोकांमध्ये फूट पाडल्याचा आरोपही केला.