राशि भविष्य
बुधवार दि. 4 ते मंगळवार दि. 10 सप्टेंबर 2024 पर्यंत
रे देवा महाराजा...
आपल्या आवडत्या गणरायाचे 7 तारखेला आगमन होत आहे. गाऱ्हाणं घालून लेखाची सुरुवात करतो. रे देवा गणेशा महाराजा, रे देवा महाराजा, 7 तारखेला तुझे आगमन होत आहे महाराजा. माझ्या वाचकांना उदंड आयुष्य दे रे महाराजा. त्यांच्या आयुष्यामध्ये सुख आणि समृद्धीची बरसात कर रे महाराजा. जो सगळ्यांना जगवतो तो शेतकरी सुखी राहू दे रे महाराजा. पीक पाणी व्यवस्थित होऊ दे रे महाराजा. व्यापारी बंधूंचा व्यापार चारपटीने वाढू दे रे महाराजा. ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांना लवकर नोकरी लाव रे महाराजा. ज्यांचे पैसे दुसऱ्याकडे अडकले आहेत ते परत मिळू दे रे महाराजा. ज्यांच्या घरामध्ये बरकत नाही त्यांच्या घरात बरकत येऊ दे रे महाराजा. ज्यांना संततीची अपेक्षा आहे त्यांना लवकर संतती होऊ दे रे महाराजा. आजारपणापासून सगळ्यांना दूर कर रे महाराजा. जे शिकत आहेत त्यांना सुबुद्धी दे रे महाराजा. परीक्षेमध्ये त्यांना चांगल्या मार्कांनी पास कर रे महाराजा. 7 तारखेला तुझे आगमन होत आहे, आम्ही सगळे प्रतीक्षा करत आहोत. आपापल्या परीने सगळ्यांनी तयारी केलेली आहे. आपापल्या पद्धतीप्रमाणे आम्ही तुझी पूजा बांधू ती स्वीकार कर रे महाराजा. आमच्या हातून कुठल्याही प्रकारे काहीही चुकीचे घडले ते पोटात घाल रे महाराजा. हे सोडून लोकांच्या मनात विचार, काही इच्छा असतील त्या पुऱ्या कर रे महाराजा. संपूर्ण भारतामध्ये सुख समृद्धी येऊ दे रे महाराजा. संपूर्ण जगामध्ये भारताचा डंका वाजू दे रे महाराजा... तुझा अखंड आशीर्वाद आमच्यावर कायम असू दे रे महाराजा...
काही आवश्यक माहिती : 1) एकदा गणेशोत्सव घरात सुरू केला ही प्रत्येकवर्षी तो केलाच पाहिजे, नाहीतर काही तरी अनिष्ट घडते हा एक मोठा गैरसमज आहे. 2) गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना केल्यानंतर अमुक इतक्या दिवसांनी विसर्जन केले पाहिजे हा दुसरा मोठा गैरसमज आहे. चतुर्थी झाल्यानंतर गणेश विसर्जन केले तरी चालते. 3) मूर्ती ही केवळ शाडूची किंवा मातीचीच असावी, पीओपीची असू नये. उत्तर भारतामध्ये गोबर गणेश ही सुद्धा प्रथा आहे. त्यामध्ये देशी गाईच्या शेणापासून त्यात माती मिसळून मूर्ती करतात. सर्वोत्तम मूर्ती ही नदीकडेच्या मातीची असते. मूर्तीला रंग हेही शक्यतो नैसर्गिक असावेत. 4) मूर्ती अवाढव्य नसावी. 5) एखाद्या राक्षसाचा वध करत असलेली मूर्ती शक्यतो नसावी. 6) मूर्ती प्रसन्न असावी, अभय हस्त असलेली असावी आणि तिच्या मागे कुंकवाने स्वस्तिक काढलेले असावे. 7) मूर्ती आणताना जर धक्का लागून एखादा अवयव भंग झाला तर त्या मूर्तीचे विसर्जन करून दुसरी मूर्ती आणावी, यात काहीतरी अपशकून आहे हे मनातदेखील आणू नये 8) मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर सुद्धा चुकून जर धक्का लागून मूर्ती भंग झाली तरी देखील कुठलाही वाईट विचार मनात न आणता गणाधीशाची कळकळीने क्षमा मागून, गुरुजींना बोलावून अद्भुत शांती करून घ्यावी, मूर्तीचे विसर्जन करावे व दुसरी मूर्ती बसवावी. 9) घरी प्राणप्रतिष्ठित गणपती असेल आणि अशौच आले तर (म्हणजे जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा घरात एखादे बाळ जन्मले) दुसऱ्याकडून पूजा करून घेऊन उत्सव पूर्ण करावा. 10) काही ठिकाणी उंदीरबी साजरी करतात. म्हणजे गणपतीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून किंवा उंदरामध्ये आणि गणपतीमध्ये पडदा टाकून उंदराला मांसाहाराचा नैवेद्य दाखवतात. हे हास्यास्पद नाही का? म्हणजे इतर दिवशी दिसला उंदीर घाल काठी, उंदीर मारण्याचे औषध ठेवा, पिंजरा ठेवा आणि त्या दिवशी मात्र मातीच्या उंदराला मांसाहाराचा नैवेद्य दाखवावा हे योग्य नाही. 11) गणेश विसर्जनानंतर कृपा करून मूर्तींची विटंबना टाळा.
मेष
कितीतरी गोष्टींबाबत भाग्यवान म्हणता येईल अशी तुमची रास येणाऱ्या काळात असेल. मुख्य म्हणजे तब्येतीची काळजी मिटेल आणि धनप्राप्ती होईल. पैशाचा योग्य वापर तुमच्या हातात न होऊ शकतो. प्रवास घडेल जमिनीचे व्यवहार मात्र पुढे ढकललेले बरे. प्रेम प्रसंगात निराश होऊ शकता. नोकरदार वर्गाला थोडा त्रास सहन करावा लागेल. भाग्य आणि मानसन्मान वृद्धी होईल.
उपाय : तांबे दान करावे.
वृषभ
तब्येत उत्तम राहील. व्याधी दूर होतील. कुटुंबात नवचैतन्य येईल. प्रवास सांभाळून करावा. मात्र चिंता वाटेल. धोकादायक गुंतवणुकीपासून दूर राहण्यात शहाणपणा आहे. नोकरदार वर्गाने वरिष्ठांची मर्जी राखलेली बरी. वैवाहिक जीवनात ताण-तणावाचे प्रसंग येऊ शकतात. वाहन चालवताना अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे. धार्मिक यात्रेबद्दल चर्चा कराल. कोर्ट मॅटरमध्ये सफलता मिळेल.
उपाय : गुरुवारी दत्त दर्शन घ्यावे.
मिथुन
आर्थिक बाबतीमध्ये अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. एखादी व्यक्ती जी तुमचे पैसे लुबाडण्याच्या मार्गावर आहे तिच्यापासून दूर राहावे. प्रवास टाळावा. कारण त्यातून धन हानी होऊ शकते. वाहनासंबंधी तक्रार येईल. गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरीत चूक घडण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. अचानक धनप्राप्तीचे योग होत आहेत. मित्रांपासून लाभ होईल.
उपाय : लहान मुलीला फळ भेट द्यावे.
कर्क
तब्येतीच्या बाबतीमध्ये पुन्हा सावध राहण्याची गरज आहे. गेले काही दिवस तब्येतीची तक्रार सुरू होती तिकडे दुर्लक्ष करू नका. आपलेच पैसे परत मिळवण्याकरता प्रयत्न करावे लागतील. कुटुंबात लहानसहान गोष्टींवरून वाद होऊ शकतो. प्रेमप्रकरणांमध्ये अपयश येण्याची संभावना आहे. नोकरदार वर्गाला फायदेशीर असा काळ आहे. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल.
उपाय : मजुरांना दुधाचे दान द्यावे.
सिंह
एरवी सुदृढ असलेली तुमची प्रकृती सध्या नाजूक झाली आहे. चिंता करण्याची गरज नसली तरी अंगावर काही काढू नका. कुटुंबात गैरसमजुतीमुळे वाद होतील. प्रवासातून फायदा होण्याची शक्यता आहे. जमिनीच्या व्यवहारांमध्ये सध्या अपेक्षा न केलेली बरी. खेळाडूंना आणि कलाकारांना चांगले दिवस आहेत. संततीकडून चांगली वार्ता मिळेल. नोकरदार वर्गाला पगारवाढ मिळू शकते.
उपाय : सूर्याला अर्घ्य द्यावे.
कन्या
प्रकृती नाजूक आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या आजारांना कमी समजून दुर्लक्ष करू नका. तसे केल्यास त्रास आणखी वाढू शकतो. पैशांच्या बाबतीत मात्र भाग्यवान असाल. अपेक्षा नसताना एखाद्या व्यक्तीकडून आर्थिक फायदा होईल. प्रवासात वस्तू गहाण होण्यासारखा प्रकार घडू शकतो. ज्येष्ठ व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल. गुंतवणुकीतून अपेक्षेइतका फायदा होईल. नोकरीत कौतुक होईल.
उपाय : मारुतीच्या मंदिरात बुंदीचा नैवेद्य दाखवावा.
तूळ
दुखणे बरे झाल्यामुळे बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देण्याकरता वेळ मिळेल. मित्रांकडून धनहानी होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरणात वादविवाद यामुळे तणाव येण्याची शक्यता आहे. प्रवास घडून त्यातून फायदा होऊ शकतो. स्थावर मालमत्तेच्या बाबतीमध्ये भाग्य साथ देईल. प्रेमसंबंधात वृद्धी होईल. संततीकडून अपेक्षापूर्तीचे दिवस आहेत. नोकरीत मात्र सांभाळून राहा.
उपाय : शुक्रवारी देवीला कुंकूमार्चन करावे.
वृश्चिक
आरोग्याच्या तक्रारी असतील तर कंटाळून न जाता योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. पैशांच्या बाबतीत नशीब साथ देईल. कामे पूर्ण करण्याकरता वेळ कमी पडू शकतो. कागदोपत्री व्यवहारांमध्ये यश मिळेल. प्रवासात फायदा होण्याची शक्यता आहे. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत सुद्धा भाग्यवान असाल. गुंतवणूक करणे टाळा. वैवाहिक जीवनात आनंदाची बरसात होईल.
उपाय : खजुराचे दान द्यावे.
धनु
डोकेदुखी किंवा अंगदुखीसारख्या आजारापासून सुटका होईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये चर्चा घडून एखादे काम पूर्ण कराल. धन मन चांगले असेल. भावंडांच्या सहकार्याने कागदोपत्री व्यवहार पूर्ण होतील. आईच्या तब्येतीची चिंता वाटू शकते. नोकरीमध्ये चांगल्या घटना घडतील, ज्याने मन आनंदी होईल. गुप्त शत्रूंच्या कारवायांकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल.
उपाय : लाल वस्तू दान द्यावी.
मकर
शरीर स्वस्थ आणि मन आनंदी अशी स्थिती असेल. कौटुंबिक वातावरणामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. पैशांच्या बाबतीमध्ये चिंता करण्याची गरज नाही. प्रवासामधून ओळखी होतील याचा पुढे जाऊन फायदा होऊ शकतो. स्थावर मालमत्तेविषयी असलेले व्यवहार सध्या टाळावे. कागदोपत्री व्यवहार सांभाळून करा. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल.
उपाय : दीप दान करावे.
कुंभ
घरातील एखाद्या व्यक्तीच्या वागण्याचा त्रास होऊ शकतो. आपल्या मनातील गोष्ट दुसऱ्यांना सांगण्याच्या भानगडीत पडू नका. तब्येत ठीकठाक राहील. पैसे मिळवण्याकरता जास्त कष्ट करण्याची गरज आहे. जमिनीच्या व्यवहारांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये दुसऱ्याच्या चुकीमुळे बोलणी खावी लागू शकतात. वैवाहिक जोडीदाराशी भांडण होण्याची शक्यता आहे.
उपाय : गाईला चारा घाला.
मीन
तब्येतीची हेळसांड करू नका. दुखणे विकोपाला जाण्याची शक्यता आहे. आर्थिक आवक ठीकठाक राहील. कामाकरता प्रवास करावा लागू शकतो. स्थावर मालमत्ता आणि वाहन याबाबतीत असलेली चिंता मिटेल. प्रेमसंबंधात दुरावा येण्याची शक्यता आहे. धोकादायक गुंतवणुकीपासून चार हात लांब रहा. नोकरीत राजकारणाचा वीट येईल. वैवाहिक जीवनात ताणतणाव असेल.
उपाय : केळीच्या झाडाची पूजा करावी.