खजाना राशिभविष्य
ऋणानुबंधाच्या गाठी...
पितृऋण, पितृदोष आणि बरंच काही...
नमस्कार कित्येकदा असे होते की, एखाद्या व्यक्तीला आपण बघतो आणि बघता क्षणी ती व्यक्ती आपल्याला आवडायला लागते. अगोदर ओळख नाही, पाळख नाही पण असे वाटते की, आपले जन्मोजन्मीचे संबंध आहेत आणि याविऊद्ध असेही होते की, दोन सख्खी भावंडे, एकाच घरात वाढलेली, एकमेकांचे तोंडही बघण्याचे टाळतात. बाकी सगळ्यांबरोबर त्यांचे संबंध चांगले असतात. पण एकमेकांशी वैरत्व! हेच अगदी वडिलांच्या आणि मुलांच्या बाबतीतही होते. काहीही कारण नाही पण मुलाने बापाबद्दल सूड भावना बाळगल्याची अनेक उदाहरणे आहेत. हे असे का? काय कारण असावे? शास्त्र म्हणते की, आपल्या घरामध्ये जन्माला येतात त्यांचे काही ऋणानुबंध असू शकतात. पूर्वजन्मीचा वैरीदेखील पोटचा मुलगा म्हणून जन्माला येऊ शकतो! म्हणजेच या सगळ्या ऋणानुबंधाच्या गाठी आहेत!!! असो, विषयाची थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडणी केली. माणसाच्या आयुष्यामध्ये कित्येक वेळेला अनेक संकटे एकदम येतात. व्यवस्थित चालत असलेली नोकरी जाते. व्यवसाय बंद पडतो. नातेवाईकांशी भांडणे होतात. संतती होण्यास विलंब होतो किंवा संतती होत नाही. अशा वेळेला जेव्हा व्यावहारिकदृष्ट्या काहीही कारण सापडत नाही तेव्हा साहजिकच माणूस ज्योतिष शास्त्राकडे वळतो. बऱ्याच वेळा, पत्रिका घेऊन गेल्यानंतर ज्योतिषी सांगतात की, तुम्हाला पितृदोष आहे. त्र्यंबकेश्वरला त्रिपिंडी आणि नारायण नागबळी करावा लागेल. अर्थात कित्येक ज्योतिषी पत्रिकेचे नीट अवलोकन न करताच तुम्हाला पितृदोष, सर्पदोष आहे. अमूक तिकडे जाऊन ही शांती करा वगैरे सांगतात तो भाग वेगळा. बरे इतके करूनसुद्धा हा पितृदोष कुंडलीतून नाहीसा होतो का? समजा संतती होत नाही आहे म्हणून एका व्यक्तीने अमुक ठिकाणी जाऊन त्रिपिंडी श्राद्ध, नारायण नागबलीसारखे विधी केले आणि नंतर त्या व्यक्तीला संतती झाली. याचा अर्थ पितृदोष गेला असे व्हायला पाहिजे आणि त्या संततीच्या कुंडलीमध्ये पितृदोष निर्माण झाला नसायला पाहिजे. पण असे होते का? कित्येक वेळेला दोन भावंडांमध्ये एकाच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे आणि दुसऱ्याच्या कुंडलीमध्ये पितृदोष नाही असे होते. दोघांचेही पितर एकच असताना असे का होते? पितृदोष आणि पितृऋण यात फरक काय आहे? किती प्रकारचे पितृदोष असतात? हा फक्त पितृ म्हणजे पित्याकडून असतो का? की आईकडून, बहिणीकडून, मामाकडून वगैरे असू शकतो? या सगळ्याबद्दल चर्चा करण्याकरता हा लेख आहे. (अनेक वाचकांच्या आग्रहावरून हा विषय पुन्हा घेत आहे)
मेष
यंदाची आपली दिवाळी छान जाणार असे दिसते. अचानक धनलाभाची शक्यता आहे. कदाचित सासरकडून काही लाभ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पण त्यासाठी अट्टहास नको. बुद्धीचा वापर करा. स्वत:ची तब्येत सांभाळण्याची गरज आहे. प्रलोभनाला बळी पडू नका.
उपाय : लक्ष्मीची आराधना करा.
वृषभ
यंदाची दिवाळी आपले भाग्य उजळून टाकणार असे दिसते. आपल्या वडिलांचा, घरातील वडिलधाऱ्या मंडळींचा आपल्यावर पूर्ण आशीर्वाद राहणार आहे. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. त्या निमित्ताने दूरचे प्रवास घडतील. आपल्या हातून काही धार्मिक कार्य घडण्याची शक्यता आहे. आपल्या आजोळकडून आपल्याला सहकार्य मिळेल.
उपाय: घरात श्रीसुक्तचा पाठ करा.
मिथुन
कर्म करीत रहा, फळ नक्की मिळेल असा या दिवाळीचा आपल्याला संदेश आहे. नोकरीत असाल तर पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे आणि स्वतंत्र व्यवसायात असाल तर व्यवसायवृद्धी होईल. पण अधूनमधून मोठ्यांचे सल्ले ऐकत जा आणि त्याप्रमाणे व्यवसायात बदल करत रहा आणि यशस्वी व्हा.
उपाय: कपाळाला केशरी गंध लावा.
कर्क
घरात काही मंगलकार्य घडण्याची शक्यता आहे. नातेवाईकांच्या, भावंडांच्या, मित्रांच्या गाठीभेटी होतील. त्यामुळे साहजिकच सगळीकडे आनंदी वातावरण असेल. आपल्याला भेटवस्तूदेखील मिळण्याची शक्यता आहे. वडिलांचा छोटा प्रवासही घडेल. हा आठवडा आपल्याला आनंद देऊन जाणार आहे.
उपाय: दर सोमवारी शंकराला बेल वाहा.
सिंह
खर्चावर नियंत्रण असलेच पाहिजे. अन्यथा बचतीला काहीच अर्थ राहणार नाही आणि मग पश्चात्तापाची पाळी येईल, असे होऊ देऊ नका. तब्येतीला सांभाळा. नोकर चाकरांचे सहकार्य चांगले मिळेल. थोडा अध्यात्माकडे कल झुकण्याची शक्यता आहे. आईचा छोटा प्रवासही घडेल. दिवाळीच्या फराळावर ताव मारताना तब्येत सांभाळा.
उपाय: मारुतीची उपासना करा.
कन्या
काही बाबतीत या आठवड्यात मन हळवे होऊन जाईल. मन ताब्यात ठेवून घ्या. बाकी हा आठवडा आपल्याला छान जाईल असे वाटते. पण थोडा आळशीपणा वाढेल. तो वाढू देऊ नका. आळशीपणामुळे कित्येकदा आलेल्या संधी हुकतात. संधीचा फायदा घ्यायला शिका. या काळात आपल्या आईचा सन्मान होण्याची शक्यता आहे.
उपाय: गणपती अथर्वशीर्ष रोज म्हणा.
तुळ
आपल्या वाणीवर संयम ठेवा. आपल्या बुद्धिमत्तेची सर्वांना ओळख होईल. आपले कौतुकही होईल. पण त्या गोष्टी डोक्यात जाऊ देऊ नका. मुलांच्या अभ्यासाकडे जरा लक्ष द्यावे लागण्याची शक्यता आहे आणि स्वत:च्या तब्येतीकडेसुद्धा. आपल्या कुटुंबाबरोबर यंदाची दिवाळी खूप छान साजरी कराल. वडिलार्जित संपत्तीच्या संदर्भात काही निर्णय घेतले जातील.
उपाय: शंकराची उपासना करा.
वृश्चिक
या आठवड्यात सर्वच कामात आपल्याला कष्ट घ्यावे लागणार असे दिसते. पण कष्टाचे फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपण केलेले काम निश्चितच उत्तमच असेल. आणि त्याबद्दलचे कौतुक आपल्या पदरात नक्की पडेल. नोकरीत असलेल्यांनी प्रामाणिकतेने काम करा. वरिष्ठ खूश होतील. दिवाळी आनंदात घालवा.
उपाय: हनुमान चालिसा म्हणा.
धनु
दिवाळीच्या निमित्ताने वाहन खरेदी करण्याचा विचार असेल तर जरुर करा. किंवा जमीन खरेदी करण्याचे विचार असतील तर जरुर करा. पण पूर्ण चौकशी करून मगच निर्णय घ्या. मातेच्या समतीने, सल्ल्याने निर्णय घ्या. आणि दिवाळीच्या आनंदात भर घाला. दिवाळीच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंबाचे सुख आणि सहवास आपल्याला मिळेल.
उपाय: गायीला गूळ खायला द्या.
मकर
या आठवड्यात आपल्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव मिळण्याची दाट शक्यता आहे. आपल्याला कुठली नवीन विद्या संपादन करावयाची असल्यास त्या विद्येचा आरंभ करण्यास काहीच हरकत नाही. यश जरुर मिळेल. जोडीदाराबरोबर चांगले सुसंवाद घडतील. हा आठवडा करमणुकीच्या साधनांमध्ये छान घालवाल.
उपाय: भिकाऱ्याला अन्नदान करा.
कुंभ
नोकर चाकरांपासून सावध रहा. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. अन्यथा फसविले जाण्याची शक्यता आहे. काही कर्ज डोक्यावर असेल तर ते या महिन्यात फेडू शकाल किंवा कर्जमुक्तीचा मार्ग सापडेल. पण पुन्हा नव्याने कर्ज घेण्याच्या भानगडीत शक्यतो पडू नका. या आठवड्यात तुम्हाला कोणती ना कोणती तरी चिंता सतावणार असे वाटते.
उपाय: मंगळवारी बजरंग बाण म्हणा.
मीन
जोडीदाराची काळजी घ्यावी लागणार असे दिसते. रोजंदारीवर काम करत असाल तर या आठवड्यात प्राप्ती थोडी कमी असेल किंवा काम मिळणार नाही. पण लगेच खचून जाऊ नका. स्वतंत्र उद्योगात असे चढउतार असायचेच. आज आहे, तर उद्या आहे पण ते लवकर संपणार नाही म्हणजे पूर्ण होणार नाही असे काहीसे होत राहील. चिंता नसावी.
उपाय: सद्गुरुची उपासना करा.