केरळची विद्यार्थिनी स्कॉटलंडमध्ये मृत्युमुखी
वृत्तसंस्था / लंडन
ब्रिटनमधील स्कॉटलंड नदीत केरळच्या एका विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला आहे. सांत्रा साजू असे तिचे नाव असून ती डिसेंबरच्या प्रारंभापासूनच बेपत्ता होती. त्याचा शोध घेतला जात होता. अखेर तिचा मृतदेह स्कॉटलंड नदीत एडिनबरा येथील न्यूब्रीजच्या नजीक आढळून आला असल्याची माहिती रविवारी देण्यात आली आहे. तिच्या भारतातील नातेवाईकांना तसे कळविण्यात आले आहे.
स्कॉटलंडची राजधानी एडिनबरा येथील हेरिऑट वॅट विद्यापीठात साजू शिकत होती. गेल्या शुक्रवारी नदीत मृतदेह आढळल्याची माहिती स्थानिक नागरीकांकडून मिळाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्याची ओळख पटविल्यानंतर माहिती तिच्या मातापित्यांना रविवारी कळविण्यात आली. या घटनेचा तपास अद्यापही केला जात आहे. ती नदीत कसा पडली याचा तपास करण्यात येत आहे. ही घटना हत्या, आत्महत्या की अपघात आहे, याचा शोध घेतला जात आहे.
सीसीटीव्ही फूटेजवरुन शोध
साजू ही विद्यार्थिनीचे शेवटचे दर्शन 6 डिसेंबरला लिव्हिंगस्टोनमधील आस्दा सुपरमार्केटमध्ये झाले होते, असे सीसीटीव्ही फूटेजवरुन उघड झाले आहे. मात्र, त्यानंतर ती कोठे गेली याचा पत्ता लागला नव्हता. तिच्या मित्रांनी ती बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना 7 डिसेंबरला दिली होती. तिची माहिती पोलिसांनी प्रसिद्ध केली होती. तसेच लोकांना ती दिसल्यास कळविण्याचे तातडीचे आवाहन करण्यात आले होते. 6 डिसेंबरला तिने बर्नव्हेल येथून एका स्थानाहून एक प्रवासी बॅग घेतली होती. मात्र, तिचा मृतदेह सापडला तेव्हा ही बॅग आढळली नाही. त्यामुळे तिच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. या प्रकरणाचा कसून तपास केला जात असून सर्व शक्यता पडताळण्यात येत आहेत, असे स्कॉटलंड पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तिच्या निकटवर्तीयांकडेही चौकशी करण्यात येत आहे.