भारताने चुकीचा समज करून घेऊ नये : आसिम मुनीर
हल्ला झाल्यास पाकिस्तान चोख प्रत्युत्तर देणार असल्याचा दावा
वृत्तसंस्था/ रावळपिंडी
पाकिस्तानचे नवे चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस (सीडीएफ) झालेले फील्ड मार्शल आसिम मुनीर यांना रावळपिंडीच्या सैन्य मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात मानवंदना देण्यात आली. यावेळी बोलताना मुनीर यांनी भविष्यात पाकिस्तानवर कुठलाही हल्ला झाल्यास त्याचे प्रत्युत्तर पूर्वीपेक्षा अधिक तीव्र आणि कठोर असेल असा दावा केला. तसेच त्यांनी भारताने कुठल्याही गैरसमजुतीत राहू नये असा इशारा दिला आहे.
आधुनिक युद्ध आता सायबरस्पेस, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, स्पेस, इन्फॉर्मेशन वॉर, एआय आणि क्वांटम कॉम्प्युटिंग यासारख्या नव्या क्षेत्रांपर्यंत वाढले आहे. सुरक्षा दलांना आता आधुनिक आव्हानांनुसार स्वत:ला बदलावे लागेल. मे महिन्यात पाकिस्तानने माझ्या नेतृत्वात भारताला चोख प्रत्युत्तर दिले होते असा दावाही त्यांनी केला आहे.
पाकिस्तान किंवा टीटीपी एकाची निवड करा
पाकिस्तान तालिबान आणि पाकिस्तान सरकारपैकी एकासोबत अफगाणिस्तानने चांगले संबंध राखावेत असा इशारा मुनीर यांनी तालिबानला दिला आहे. पाकिस्तान शांतताप्रिय देश आहे, परंतु देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्वावर कुठलीच तडजोड केली जाणार नाही. अफगाण तालिबान पाकिस्तानात सक्रीय दहशतवाद्यांचे समर्थन करत असल्याचा आरोप मुनीर यांनी केला आहे. भारताची मदत लाभणाऱ्या समुहांना तालिबानचे समर्थन मिळत असल्याचा दावा मुनीर यांनी यापूर्वी केला होता.
4 डिसेंबरला सीडीएफ नियुक्ती
पाकिस्तान सरकारने 4 डिसेंबर रोजी आसीम मुनीर यांना देशाचा पहिला चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस (सीडीएफ) आणि चीफ ऑफ आर्मी स्टाफ (सीओएएस) म्हणून नियुक्त केले होते. दोन्ही पदांवर त्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असेल. नियुक्तीला राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी मंजुरी दिली होती. एकाचवेळी सीडीएफ आणि सीओएएस ही दोन्ही पदे सांभाळणारे मुनीर हे पाकिस्तानचे पहिले सैन्याधिकारी ठरले आहेत.