केरळचा गतविजेत्या मुंबईला धक्का, आसिफचे 5 बळी
वृत्तसंस्था/लखनौ
स्थानिक हंगामात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या वेगवान गोलंदाज के.एम.आसिफने पाच विकेट घेतल्यामुळे गुरूवारी येथे सय्यद मुश्ताक अली चषक ग्रुप अ सामन्यात केरळने गतविजेत्या मुंबईला 15 धावांनी पराभवाचा धक्का दिला. टी-20 स्पर्धेत पाच सामन्यांत पहिला पराभव स्वीकारणाऱ्या मुंबईने 16 गुणांसह गटात आघाडी कायम ठेवली आहे. तर पाच संघांच्या गटात तिसऱ्या विजयानंतर केरळ 12 गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. आंध्र दुसऱ्या स्थानावर आहे. नेट रनरेटमध्ये केरळ आंध्रपेक्षा किंचित मागे आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुर आणि राष्ट्रीय टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांच्यासारखे स्टार खेळाडू असलेला मुंबई संघ 179 धावांचा पाठलाग करताना 19.4 षटकांत सर्वबाद 163 धावांत गारद झाला. त्याआधी केरळने निर्धारित षटकात 5 बाद 178 धावा केल्या होत्या. आयपीएल 2026 च्या हंगामापूर्वी राजस्थान रॉयल्समधून चेन्नई सुपर किंग्जमध्ये स्थलांतरीत झालेला भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने 28 चेंडूत 46 धावा करुन केरळला
चॅलेंजिंग धावसंख्या गाठून दिली. केरळच्या कर्णधाराच्या आठ चौकार आणि एका षटकारासह केलेल्या धमाकेदार खेळीमुळे त्याच्या संघाला चांगली सुरुवात मिळाली. पण रोहन कुन्नुम्मल (2) आणि सॅमसन लागोपाठ बाद झाल्याने सातव्या षटकांत त्यांची स्थिती 2 बाद 58 अशी झाली. सॅमसनने सर्वाधिक स्ट्राईक घेतला. त्याच्या सलामी जोडीदाराला फक्त पाच चेंडू देवून त्याने सुरूवातीलाच मुंबईच्या स्टार गोलंदाजांना अडचणीत आणले. सॅमसन बाद झाल्यानंतर धावसंख्येचा वेग मंदावला. विष्णू विनोदने 40 चेंडूत नाबाद 43 धावा काढल्या. ज्यामध्ये फक्त तीन चौकारांचा समावेश होता. तथापि, विनोदने मोहम्मद अझहरुद्दीन (32) आणि वेगवान गोलंदाज शराफुद्दिनने 15 चेंडूत नाबाद 35 धावा फटकावत केरळला अखेरच्या टप्प्यात 63 धावांची भागीदारी करुन लढाऊ धावसंख्या उभारली.
मुंबईचा आयुष म्हात्रे (3) लवकर बाद झाल्यानंतर रहाणेने 18 चेंडूत 32 आणि सरफराज खानने 40 चेंडूत 52 धावा केल्या. त्यांनी दुसऱ्या गड्यासाठी 80 धावांची भागीदारी केली. 12 व्या षटकांत 3 बाद 99 धावा असताना गतविजेत्या संघाला आरामदायी वाटत होते. पण आसिफने टाकलेल्या गोलंदाजीने चित्र उलटले. आसिफने (25 धावांत 5) साईराज पाटील 13, सूर्यकुमार 32 आणि शार्दुल 0 यांचे बळी घेतले आणि मुंबईची अवस्था 7 बाद 149 अशी झाली. त्याने शेवटच्या षटकांत शम्स मुलानी आणि हार्दीक तमोरे यांना बाद करुन मुंबईचा डाव संपुष्टात आणला. लखनौ हे 32 वर्षीय आसिफसाठी आनंददायी शिकारभूमी बनले आहे. कारण या हंगामात त्याने या मैदानावर या स्पर्धेत 13 बळी घेतले आहेत.
संक्षिप्त धावफलक
केरळ 20 षटकांत 5 बाद 178 (संजू सॅमसन 46, विष्णू विनोद 43, शार्दुल ठाकुर 34-1, शिवम दुबे 18-1), मुंबई 19.4 षटकांत सर्व बाद 163 (सरफराज खान 52, अजिंक्य रहाणे 32, सूर्यकुमार यादव 32, केएम आसिफ 5-24, विघ्नेश पुथुर 2-31). आसाम 20 षटकांत 7 बाद 175 (अब्दुल कुरैशी 57, निहार डेका 52, यश ठाकुर 3-36), विदर्भ 17.5 षटकांत 117 (मुख्तार हुसेन 3-36, आकाश सेनगुप्ता 3-12).छत्तीसगड 50 षटकांत 6 बाद 158 (अमनदीप खरे 44, शशांक सिंग 46, पृथ्वी राज 2-35, के.व्ही. शशिकांत 2-36), आंध्र 18.5 षटकांत 2 बाद 159 (अश्विन हेब्बर 50, शेख रशीद नाबाद 59).