Satara | केरा-मणदुरे उपसासिंचन योजनेचा शुभारंभ, त्वरित कामाला सुरुवात होणार: मंत्री शंभूराज देसाई
केरा व मणदुरे उपसासिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचे शुभारंभ
सातारा - केरा व मणदुरे भागातील अडीच हजार हेक्टर क्षेत्रावरील सिंचनासाठी सर्वेक्षण होणार आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर आराखडा तयार होईल. यानंतर त्वरित प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली
केरा, मणदुरे विभागातील निवकणे चिटेघर व बिबी या लघु प्रकल्पाच्या दोन्ही तीरावरील गावांना 100 मीटर उंचीपर्यंत शेतीसाठी उपसा सिंचनाद्वारे पाणी उचलून देण्याच्या सर्वेक्षण कामाचा शुभारंभ पालकमंत्री देसाई यांच्याहस्ते झाला. केरा तालुका पाटण येथे झालेल्या कार्यक्रमास दादासाहेब जाधव, दादासाहेब पाटील, भरत पाटील, अभिजीत पाटील, एन डी पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
केरा व मणदुरे या भागातील नागरिक पिढ्यानपिढ्या पाण्यापासून वंचित राहिले आहेत, असे सांगून पालकमंत्री देसाई म्हणाले, या भागाला उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून 100 मीटर अंतर पाणी शासनामार्फत तारळी पॅटर्न प्रमाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे पाणी धरणातून व केरा नदीच्या पात्रातून दोन्ही तीरावरील गावांना उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
केरा व मणदुरे या भागाला पाणी उपलब्ध व्हावे यासाठी विविध बैठका घेऊन शासनस्तरावर पाठपुरावा केला. उपलब्ध होणाऱ्या पाण्यामुळे या भागाचा कायापालट होणार आहे. पीक पद्धतीही बदल होणार आहे तसेच रोजगारासाठी होणारे स्थलांतरही थांबणार आहे. सर्वेक्षण करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. देसाई यांनी शुभारंभ प्रसंगी केला. या कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.