दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये केनियाचे वर्चस्व
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रविवारी येथे झालेल्या वेदांता दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये केनियाच्या स्पर्धकांनी आपले निर्विवाद वर्चस्व राखले. केनियाच्या अॅलेक्स मेटाटा आणि लिलियन रेंगरुक यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या विभागातील अजिंक्यपद पटकाविले.
केनियाच्या अॅलेक्स मेटाटाने गेल्या वर्षी या स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते. त्याने पुरुषांच्या विभागात 59 मिनिटे, 50 सेकंदाचा अवधी घेत प्रथम स्थानासह विजेतेपद हस्तगत केले. तर महिलांच्या विभागात केनियाच्या रेंगरुकने 1 तास, 07 मिनिटे आणि 20 सेकंदाचा अवधी घेत प्रथम स्थान पटकाविले. दिल्लीच्या दमट हवामानामुळे स्पर्धकांची चांगलीच दमछाक झाली. केनियाच्या मेटाटा आणि रेंगरुक यांना या विजेतेपदाबरोबरच प्रत्येकी 27 हजार अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस देण्यात आले. दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये सुमारे 40 हजार स्पर्धकांनी आपला सहभाग दर्शविला होता. ही स्पर्धा 4 विविध गटांमध्ये घेतली गेली. हाफ मॅरेथॉन, खुली 10 कि.मी. पल्ल्याची, दिव्यांगांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी असे 4 गटांमध्ये सदर स्पर्धा घेतली.
या स्पर्धेत पुरुषांच्या विभागात इथोपियाच्या तेस हॅगेरने दुसरे स्थान तर इथोपियाच्या जेम्स किपकोगोईने तिसरे स्थान मिळविले. महिलांच्या विभागात इथोपियाच्या बिराटूने दुसरा क्रमांक तर मुलेत टिकेलीने तिसरे स्थान मिळविले. भारतीय स्पर्धकांच्या गटामध्ये पुरुषांच्या विभागात अभिषेक पाल तर महिलांच्या गटात सीमा यांनी विजेतीपदे मिळविली. दिल्ली हाफ मॅरेथॉनला जवाहरलाल नेहरु स्टेडियमपासून प्रारंभ करण्यात आला. या स्पर्धेसाठी एकूण 260,000 अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षिसाची रक्कम ठेवण्यात आली होती