For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केजरीवालांची ‘होळी’ कोठडीत

06:58 AM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
केजरीवालांची ‘होळी’ कोठडीत
New Delhi: Delhi Chief Minister Arvind Kejriwal being taken to the Enforcement Directorate office in an excise policy-linked money laundering case, in New Delhi, Thursday, March 21, 2024. (PTI Photo) (PTI03_22_2024_000003B)
Advertisement

सहा दिवसांच्या ईडी कोठडीत रवानगी : मद्य घोटाळ्यात तेच मुख्य सूत्रधार : ईडीचा दावा

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना न्यायालयाने सहा दिवसांची ईडी कोठडी ठोठावली आहे. न्यायालयाने 28 मार्चपर्यंत कोठडी ठोठावल्याने आता त्यांची ‘होळी-रंगपंचमी’ कोठडीतच होणार आहे. सुनावणीदरम्यान ईडीने अरविंद केजरीवाल हेच मद्य घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचे सांगितल्याने त्यांना राऊस एव्हेन्यू न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. तत्पूर्वी, अरविंद केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना राऊस एव्हेन्यू कोर्ट किंवा उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. त्यानंतर केजरीवाल यांनी आपली याचिका मागे घेतली.

Advertisement

केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती. त्यानंतर ईडीने न्यायालयाकडे अधिक चौकशीसाठी त्यांच्या 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. तसेच ईडीच्या रिमांड नोटमध्ये आप पक्षाचे वर्णन ‘कंपनी’ असे करण्यात आले आहे. ईडीच्या रिमांड नोटमध्ये केजरीवाल हे मास्टरमाइंड असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अबकारी धोरण बनवण्यात केजरीवाल यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे ईडीने लिहिले आहे. त्याला अनुसरून राऊस एव्हेन्यू न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना ईडीकडे कोठडी दिली. अशा परिस्थितीत आता केजरीवाल 28 मार्चपर्यंत रिमांडवर राहणार आहेत. आता ईडीचे अधिकारी मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत या संपूर्ण प्रकरणातील मनी टेलची चौकशी करू शकते.

गोवा निवडणुकीसाठी निधी वापरल्याचा दावा

केजरीवाल यांच्या कोठडीची मागणी करताना ईडीने न्यायालयात अनेक दावे केले आहेत. त्यानुसार, मद्य घोटाळ्यात मिळालेला पैसा गोवा विधानसभा निवडणुकीत वापरला गेला. केजरीवाल यांनी लाच मागितल्याचे पुरावे असल्याचे ईडीने म्हटले आहे. या प्रकरणातील आरोपी विजय नायर हा अरविंद केजरीवाल यांच्यासाठी काम करत होता. तसेच केजरीवाल यांनी उद्योगपतींकडून पैसे घेत दक्षिण लॉबीकडे पैसे मागितले. या प्रकरणी ईडीने बीआरएस नेत्या के कविता यांना यापूर्वीच अटक केली आहे. तसेच शुक्रवारी न्यायालयाने के. कविता यांचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे.

राजीनामा देणार नाही : केजरीवाल

न्यायालयीन सुनावणीनंतर अरविंद केजरीवाल यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले असून कोठडी ठोठावली तरी आपण मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आपण मुख्यमंत्रिपदी कायम राहणार असून तुरुंगातून सरकार चालवायची आपली तयारी असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यापूर्वी आप सरकारमधील मंत्र्यांनीही अशाचप्रकारचा दावा करत तुरुंगातून सरकार चालविण्याची आपली तयारी असल्याचे स्पष्ट केले होते. ईडीच्या ताब्यात आल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आणखी एक वक्तव्य करताना आपले आयुष्य देशासाठी समर्पित असल्याचे स्पष्ट केले. मी तुऊंगात असो वा बाहेर, माझे जीवन देशासाठी समर्पित आहे, असे राऊस एव्हेन्यू कोर्टासमोर हजर करण्यासाठी नेत असताना केजरीवाल म्हणाले.

26 मार्चला पंतप्रधान निवासाला घेराव

26 मार्च रोजी आम आदमी पार्टी पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालणार आहे. मुख्यमंत्र्यांवर झालेली कारवाई चुकीची असून त्याविरोधात आम आदमी पक्ष आवाज उठवणार असल्याचे दिल्ली सरकारमधील मंत्री गोपाल राय म्हणाले. रस्त्यावरील आंदोलनादरम्यान दिल्लीतील शाहिदी पार्क येथे ‘आप’चे दिल्लीतील सर्व आमदार, नगरसेवक आणि ‘इंडिया’ आघाडीचे विविध नेते हुकूमशाहीविरोधात शपथ घेणार आहेत. इतकेच नाही तर केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात ‘आप’ होळीचा कार्यक्रम साजरा करणार नाही आणि देश वाचवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी लोकांना एकत्र येण्याचे आवाहन करणार असल्याचेही ते पुढे म्हणाले.

घोटाळा, फसवणुकीचे भक्कम पुरावे : ईडी

घोटाळा आणि फसवणूक झाल्याचे सबळ पुरावे आपल्याकडे असल्याचे ईडीने न्यायालयात सांगितले. गोवा निवडणुकीसाठी निधी उभारण्यासाठी उत्पादन शुल्क धोरणात बदल करण्यात आला. फिर्यादी प्रकरणाची चाचणी घेण्यात आली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने ती कायम ठेवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या सर्व बाबी तपासून मनीष सिसोदिया यांना जामीन देण्यास नकार दिला. तपासात अनेक पदर आहेत, या प्रकरणाच्या तळापर्यंत जायला हवे, असा युक्तिवादही ईडीकडून करण्यात आला.

 ‘इंडिया’ आघाडीची निवडणूक आयोगाकडे धाव

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात विरोधक एकवटले आहेत. ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी शुक्रवारी दिल्लीत निवडणूक आयोगाच्या  आयुक्तांची भेट घेतली. केजरीवाल यांच्या अटकेमुळे संतप्त झालेल्या विरोधी पक्षनेत्यांनी आयोगाच्या हस्तक्षेपाची मागणी केली. ‘इंडिया’ आघाडीच्या शिष्टमंडळात के. सी. वेणुगोपाल, काँग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी, डेरेक ओब्रायन, तृणमूल काँग्रेसचे मोहम्मद नदीमुल हक, सीपीआय-एमचे सीताराम येचुरी, आम आदमी पक्षाचे संदीप पाठक आणि पंकज गुप्ता, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड, समाजवादी पक्षाचे खासदार जावेद अली यांचा समावेश होता. हा मुद्दा थेट राज्यघटनेच्या मूळ रचनेशी संबंधित आहे. जेव्हा सरकारी यंत्रणांचा गैरवापर होतो तेव्हा संविधान आणि लोकशाहीवर हल्ला होतो, असे काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी म्हणाले.

Advertisement
Tags :

.