For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घुसखोरीमुळे हिंदू नाहीसे होतील !

07:05 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
घुसखोरीमुळे हिंदू नाहीसे होतील
Advertisement

भारतीय जनता पक्षाच्या खासदाराकडून लोकसभेत चिंता व्यक्त

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

बांगला देशातून मोठ्या प्रमाणावर मुस्लीमांची घुसखोरी भारतात होत आहे. हे मुस्लीम देशाच्या आदीवासी भागांमध्ये शिरत आहेत. ते आदीवासी तरुणींशी संबंध जोडत आहेत. यामुळे आदीवासींची लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे. ही प्रक्रिया रोखली नाही, तर अशा घुसखोरीमुळे हिंदू नाहीसेच होतील, अशी चिंता भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत व्यक्त केली आहे. त्यांनी गुरुवारी हा विशेष मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. ते झारखंडमधील खासदार आहेत. 2000 मध्ये झारखंड राज्य बिहारपासून वेगळे झाले. तेव्हा झारखंडमध्ये आदीवासी आणि वनवासींची संख्या संथाल परगाणा भागात 36 टक्के होती. आता ती केवळ 26 टक्के राहिली आहे. हे 10 टक्के हिंदू आदीवासी कोठे गायब झाले ? असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारने हे प्रकार रोखण्यासाठी राष्ट्रीय नागरीक नोंदणी कायदा त्वरित लागू करावा. झारखंडमधील हेमंत सोरेन यांचे सरकार घुसखोरीकडे दुर्लक्ष करीत आहे. कारण झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस इत्यादी पक्षांना त्यांची मुस्लीम व्होटबँक महत्वाची वाटते. त्यांना देशाची किंवा हिंदूंची चिंता नाही, असा आरोप त्यांनी केला.

Advertisement

आदीवासींचे धर्मांतर मोठ्या प्रमाणात

बांगला देशातून येणारे मुस्लीम घुसखोर आदीवासी महिलांशी विवाह करीत आहेत. संथाल प्रदेशात 100 खेड्यांच्या प्रमुख आदीवासी महिला आहेत. मात्र, त्यांचे पती मुस्लीम आहेत. ही स्थिती भारतासाठी आणि हिंदूंसाठी भयावह आहे. केंद्र सरकारने त्वरित हे प्रकार रोखण्यासाठी पावले उचलावीत. मुस्लीम घुसखोर पश्चिम बंगालमधून भारतात सर्वत्र पसरतात. त्यामुळे पश्च्िाम बंगालमधील माल्दा आणि मुर्शिदाबाद तसेच बिहारमधील किशनगंज, अररिया, कटीहार आदी जिल्ह्यांचा केंद्रशासित प्रदेश बनविण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

अर्थसंकल्पाची चर्चा

लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चा गुरुवारी पुढे सुरु राहिली. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी अर्थसंकल्प दिशाहीन असल्याची टीका केली. केंद्रीय अर्धसैनिक दलांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करा, अशी मागणी समाजवादी पक्षाने केली. जुन्या निवृत्तीयोजनेची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. केंद्र सरकारने यावर त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे खासदार दीपेंद्र हुडा यांनी केली.

विरोधकांचा सभात्याग

लोकसभेत अर्थसंकल्पावर चर्चा होत असताना विरोधी पक्षांच्या अनेक सदस्यांनी काहीकाळ सभात्याग केला. सरकारने आर्थिक साहाय्य देताना विरोधी पक्षांची सत्ता असणाऱ्या राज्यांवर अन्याय केला आहे. त्यांना त्यांचा योग्य वाटा मिळालेला नाही, अशी टीका काही सदस्यांनी केली. मात्र, भोजनच्या सुटीनंतर कामकाज पुन्हा सुरु झाले. अर्थसंकल्पावर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.

बिट्टू आणि चन्नी यांच्यात शब्दद्वंद्व

गुरुवारी लोकसभेत केंद्रीय मंत्री रवनीतसिंग बिट्टू आणि काँग्रेसचे खासदार चरणजीत चन्नी यांच्यात जोरदार वाद पेटला. हे सरकार देशाच्या विमानतळांसह सर्व आस्थापनांची विक्री करीत आहे. हे सरकार ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे आहे, असा आरोप चन्नी यांनी केला. त्यांनी केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांच्यावर काही व्यक्तीगत टिप्पणी केली. आपण ज्या दिवशी काँग्रेस सोडली त्याच दिवशी आपले पिता दिवंगत झाले, अशी भाषा त्यांनी बिट्टू यांना उद्देशून केली. यावर, माझ्या पित्याने देशासाठी प्राणार्पण केले. काँग्रेससाठी नव्हे, असा प्रतिवार बिट्टू यांनी केला. लोकसभा अध्यक्षांनी चन्नी यांना व्यक्तीगत टिप्पणी न करण्याचा इशारा दिला.

Advertisement
Tags :

.