विपश्यना केंद्रातून केजरीवाल माघारी
नव्या ऊर्जेने जनतेच्या सेवेत उतरणार असल्याचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी विपश्यना ध्यान केंद्र सोडले. गेल्या दहा दिवसांपासून ते पंजाबमधील विपश्यना केंद्रात ध्यानसाधना करत होते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत यासंबंधीची माहिती दिली. ‘10 दिवसांच्या विपश्यना ध्यानानंतर आज परतलो. ही साधना अपार शांती देते. आजपासून पुन्हा नव्या ऊर्जेने जनतेची सेवा सुरू करू’ असा संदेश त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही केजरीवाल 10 दिवसांच्या विपश्यना ध्यान कार्यक्रमात सहभागी झाले होते. गेल्या काही वर्षांत विपश्यनेसाठी त्यांनी बेंगळूर आणि जयपूरसह अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत. एकीकडे त्यांची ध्यानसाधना सुरू असतानाच दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने केजरीवाल यांना चौकशीसाठी तिसऱ्यांदा समन्स बजावले आहे. आता 3 जानेवारी 2024 रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यापूर्वी ईडीने त्यांना 21 डिसेंबरला हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार अरविंद केजरीवाल सध्या पंजाबमध्ये विपश्यना केंद्रात पोहोचले असल्याने ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले नव्हते.