दिल्ली निवडणुकीपूर्वी केजरीवालांचा काँग्रेसला झटका
माजी आमदाराचा आम आदमी पक्षात प्रवेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीत विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला आणखी एक झटका बसला आहे. काँग्रेसचे तीनवेळा आमदार म्हणून निवडून आलेले नेते वीर सिंह धींगान यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. आप संयोजक अरविंद केजरीवाल यांनी वीर सिंह यांचे पक्षात स्वागत केले आहे. तर संबंधित मतदारसंघाचे आमदार राहिलेले आप नेते राजेंद्र पाल गौतम यांनी यापूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
वीर सिंह धींगान हे अनेक वर्षांपासून जनतेसाठी काम करत राहिले आहेत. आम आदमी पक्षात त्यांनी प्रवेश केल्याने आमच्या दलित उत्थानाच्या कामाला मोठी मजबुती मिळणार आहे. सीमापुरी मतदारसंघात धींगान यांनी खूप कमा केले आहे. आम्ही सीमापुरीच्या भावी आमदाराला ‘आप’मध्ये सामील करत आहोत. दिल्लीतील जनता आम आदमी पक्षासोबत असून इतर पक्षांमधील चांगले नेते आमच्यासोबत जोडले जात आहेत असा दावा केजरीवाल यांनी केला आहे.