केजरीवालांनी मुस्लिमांना देशभरात केले बदनाम
असदुद्दीन ओवैसी यांनी साधला निशाणा
गुजरात निवडणुकीत मतदानाची तारीख नजीक येऊ लागताच वाप्युद्ध तीव्र होत चालले आहे. पहिल्यांदाच गुजरात निवडणूक लढविणाऱया असदुद्दीन आवैसी यांच्या पक्षाने आता काँग्रेस अन् आम आदमी पक्षावर निशाणा साधला आहे. ओवैसी यांनी केजरीवालांना लक्ष्य करत त्यांना ‘छोटा रिचार्ज’ संबोधिले आहे. कोरोनाकाळात केजरीवालांनी मुस्लिमांना देशभरात बदनाम केल्याचा आरोप औवैसी यांनी केला आहे.
काँग्रेसला लोकांनी एक संधी दिली, मग दुसरी संधी दिली, तिसऱयांदा काँग्रेस अपयशी ठरल्यावर छोटा रिचार्जचा हात पकडला. केजरीवालांनी मुस्लिमांना देशभरात बदनाम केले आहे. देशात कोरोना संकट सुरू झाल्यावर सर्वप्रथम मुस्लिमांना बदनाम करण्याचे काम केले गेले. तबलिगी जमातबद्दल दुष्प्रचार करण्यात आला. जहांगिरपुरीमध्ये हिंसा झाल्यावर तेथे बुलडोझर चालविण्यात आल्याचे म्हणत ओवैसी यांनी केजरीवालांना लक्ष्य केले आहे.
लोकांना टोपी घालण्याचे काम
नरेंद्र मोदी हे टोपी घालत नाहीत, तर केजरीवाल समोर येईल त्याला टोपी घालत आहेत. बिलकिस बानो मुद्दय़ावर केजरीवालांनी तोंडातून अवाक्षरही काढले नाही. समान नागरी संहितेवर ते काहीच बोलत नाहीत. केजरीवालांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान तबलिगी जमातला सुपरस्प्रेडर ठरविले होते. उच्च न्यायालयात हा मुद्दा पोहोचल्यावर केजरीवालांना खोटारडा सिद्ध करण्यात आल्याचा दावा ओवैसी यांनी केला आहे.
भाजपही लक्ष्य
बिलकिस बानो यांच्यावर बलात्कार करणाऱया दोषींची मुक्तता का करण्यात आली? बलात्काराच्या गुन्हेगारांना संस्कारी म्हणणाऱया व्यक्तीला भाजपने उमेदवारी दिली आहे. नरोदा पाटियामध्ये मुस्लिमांची हत्या करणारा मोदींसाठी मते मागत आहे. भाजप या प्रकाराला धडा शिकविणे म्हणत आहे. भाजपचा मुस्लिमांसोबतचा हाच सबका विकास असल्याची टीका ओवैसी यांनी केली आहे.
मते विभागणारा पक्ष नव्हे
एआयएमआयएमला मते विभागणारा पक्ष ठरविणाऱया काँग्रेस अन् आम आदमी पक्षाला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गुजरातमध्ये मी कुठल्याच पक्षाची मते विभागण्यासाठी आलेलो नाही. मागील 27 वर्षांपासून भाजप गुजरातमध्ये सत्तेत आहे. काँग्रेस भाजपला पराभूत करण्यास अपयशी का ठरले? आमचा पक्ष राज्यातील 182 पैकी केवळ 13 जागांवर निवडणूक लढवत आहे. काँग्रेसने 169 जागा जिंकाव्यात आणि सरकार स्थापन करावे असे ओवैसी यांनी म्हटले आहे.
मुस्लिमांभोवती फिरणारे राजकारण ओवैसी यांचा एआयएमआयएम हा पक्ष गुजरातमध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. गुजरातमध्ये मुस्लिमांचे प्रमाण सुमारे 9 टक्के आहे. तरीही भाजपने एकही मुस्लीम उमेदवार दिलेला नाही. तर काँग्रेसने 6 आणि आम आदमी पक्षाकडून दोन मुस्लीम उमेदवार उभे करण्यात आले आहेत.