शब्द पाळणे हीच जगातील सर्वात मोठी ताकद!
उपमुख्यमंत्री शिवकुमार यांचे प्रतिपादन : बेंगळुरात संविधान दिन कार्यक्रम
बेंगळूर : शब्दाची ताकद हीच जगातील सर्वात मोठी ताकद आहे. आपला शब्द पाळणे हीच जगातील सर्वात मोठी ताकद आहे. न्यायाधीश असो, राष्ट्रपती असो, मी असो किंवा अन्य कोणीही, दिलेल्या शब्दाप्रमाणे वागले पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केले. बेंगळूरमधील प्रदेश काँग्रेस कार्यालयात आयोजित संविधान दिन कार्यक्रमात ते बोलत होते. संविधान हा लोकशाहीचा आत्मा आहे. आम्ही संविधानातील तत्त्वे ते आपल्या जीवनात लागू केली आहेत, असे ते म्हणाले. दोन महिन्यापूर्वी दिल्लीत एआयसीसीच्या कायदा कक्षाच्या कार्यक्रमात सहभागी झालो तेव्हा वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी मतचोरीविषयी सांगितले होते. सर्वत्र होत असलेल्या मतचोरीचा पर्दाफाश करण्यासाठी रक्तपेढीच्या धर्तीवर सर्व 224 विधानसभा मतदारसंघांमध्ये लीगल बँक स्थापन करण्याची हाक त्यांनी दिली होती, असेही शिवकुमार यांनी सांगितले.
224 मतदारसंघांमध्ये लीगल बँक
मी पक्षाच्या राज्य कायदा युनिटचे अध्यक्ष धनंजय यांना सहा महिन्यांची मुदत दिली असून 224 मतदारसंघांमध्ये किमान 10 वकिलांचा समावेश असणारे लीगल बँक स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या वकिलांनी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पक्षाच्या आचारविचारांचे रक्षण करावे. येत्या कालावधीत राज्यस्तरीय समिती नेमावी, असेही ते म्हणाले.