बेळगावातील बकरी मंडईची जागा कायम ठेवा
निपाणी खाटीक समाजाची मागणी
बेळगाव : गणाचारी गल्ली येथील बकरी मंडई गेल्या 100 वर्षांपासून अस्तित्वात आहे. त्याठिकाणी कलाल व मुस्लीम खाटीक व्यापारी कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातून येत असतात. बकरी खरेदी-विक्री करणे हाच प्रमुख व्यवसाय खाटीक समाजाचा असून त्याठिकाणी धनगर व खाटीक समाजाचे बिरदेव मंदिर आहे. परगावाहून आलेले विक्रेते व व्यापारी त्याठिकाणी वास्तव्य करतात. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या या खाटीक समाजाचा मांस विक्री हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे बकरी मंडईतील जागा कायम ठेवावी, या मागणीचे निवेदन निपाणी खाटीक समाजाच्यावतीने रविवारी पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांना देण्यात आले.
बकरी खरेदी आणि विक्री व्यवसायावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे बकरी मंडईची जागा राखीव ठेवण्यात यावी, त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ नये अशी मागणी निपाणी हिंदू खाटीक समाज, निपाणी हिंदू खाटीक युवा संघटना व महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग हिंदू खाटीक महासंघ निपाणी यांच्यावतीने निपाणी खाटीक समाजाचे अध्यक्ष धनाजी क्षीरसागर, उपाध्यक्ष रविंद्र घोडके, सेक्रेटरी अनिल फुटाणकर यांनी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांची निपाणी येथील शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन केली. यावेळी खाटीक समाजाचे संचालक बाबासाहेब घोडके, सुधाकर घोडके, दिगंबर शारबिद्रे, ओमकार लाटकर व समाजबांधव आणि संचालक मंडळ यांच्यासह माजी सभापती राजन चिकोर्डे, बेळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्षा योगिता कांबळे आदी उपस्थित होते.