कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नदीकाठच्या गावांवर लक्ष ठेवा

12:42 PM Jun 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सूचना : अधिकाऱ्यांनी समन्वयाने कार्य करावे

Advertisement

बेळगाव : शेजारील महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला असून बेळगाव जिल्ह्यातील नद्यांमध्ये पाणी वाढले आहे. जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना पुराचा धोका पोहचू नये, याची दखल घेऊन सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने कार्य करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शनिवार दि. 28 रोजी झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये  अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन बोलत होते. महाराष्ट्राच्या घाट प्रदेशात पावसाचा जोर वाढत असून तेथील बहुतांशी धरणे तुडुंब झाली आहेत. धरणातील पाण्याच्या पातळीबाबत महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून उपाययोजना वेळीच हाती घ्यावी.

Advertisement

जिल्ह्यात पुराचा धोका पोहचणाऱ्या गावातील जनता आणि जनावरांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यासाठी तयारी करावी. निवारा केंद्रांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील मदत केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी. पात्राबाहेर वाहणाऱ्या नद्या, ओढे, नाल्यांच्या भागात राहणारे नागरिक व जनावरांना धोका पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी. पुलावरून ये-जा करणे, वाहने घेऊन जाणे, याला प्रतिबंध करण्यासाठी फलक लावावेत. आवश्यक असलेल्या ठिकाणी पोलीस नेमण्यात यावेत. पूरपरिस्थितीला समर्थपणे सामोरे जाण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी बैठका घेऊन पूरपरिस्थितीत हाती घेण्याच्या खबरदारीची माहिती द्यावी. पर्यटनस्थळावर दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी होत असून या स्थळांवर दुर्घटना घडू नये या दृष्टीने उपाययोजना हाती घ्याव्यात, अशा सूचनाही जिल्हाधिकारी रोशन यांनी केल्या.

शिथिल बनलेल्या वर्गखोल्यांमध्ये वर्ग घेऊ नयेत

पुराचा धोका असलेल्या नदी काठच्या गावांसाठी स्थानिक प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना राबवावी, अशी सूचना जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे यांनी केली. पावसाचा जोर वाढत असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना घरापर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्याच्या दृष्टीने शाळा प्रमुख, स्थानिक व्यवस्थापनाने दखल घ्यावी. शिथील बनलेल्या वर्गखोल्यांमध्ये वर्ग घेऊ नयेत, अशी सूचनाही शिंदेंनी केली. अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, महापालिका आयुक्त शुभा बी., जि. पं. चे योजना संचालक गंगाधर दिवटर, शिक्षण खात्याच्या उपसंचालिका लिलावती हिरेमठ, हातमाग-वस्त्रोद्योग खात्याचे उपसंचालक बसवराज पाटील, बागायत खाते उपसंचालक महांतेश मुरगोड यांच्यासह हेस्कॉम, पोलीस खाते, सर्व तालुक्यांचे तहसीलदार, ता. पं. चे कार्यकारी अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.

शहरी भागात कंट्रोल रुम स्थापन

पोलीस उपायुक्त रोहन जगदीश म्हणाले, संभाव्य पूरपरिस्थितीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने शहरी भागात कंट्रोल रुम स्थापन करण्यात आले आहेत. शहर किंवा जिल्ह्याच्या कोणत्याही भागात कोणतीही समस्या उद्भवल्यास 112 क्रमांकावर संपर्क साधावा.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article