For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

समाज माध्यमांवर कडक नजर ठेवा

10:09 AM Apr 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
समाज माध्यमांवर कडक नजर ठेवा
Advertisement

निरीक्षक एम. के. अरविंदकुमार यांची अधिकाऱ्यांना सूचना : माध्यम विभागाला भेट

Advertisement

बेळगाव : लोकसभा निवडणूक रिंगणात असणाऱ्या उमेदवारांकडून टीव्ही चॅनेल, वृत्तपत्र यांच्यासह सोशल मीडियावर दिल्या जाणाऱ्या जाहिरातींवर आणि प्रचाराच्या खर्चावर नजर ठेवण्यात यावी, असे बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक आयएएस अधिकारी एम. के. अरविंदकुमार यांनी अधिकाऱ्यांना सूचना केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वार्ता भवन येथे स्थापन केलेल्या माध्यम प्रमाणिकरण आणि निरीक्षण (एमसीएमसी) विभागाला रविवारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. गेल्या काही दिवसांपासून देशभरात सोशल मीडियाचा प्रभाव वाढला आहे. युट्यूब यासारख्या माध्यमाचा राजकीय प्रचारासाठी उमेदवारांकडून उपयोग केला जात आहे. अशा प्रचाराच्या माध्यमांवर नजर ठेवण्यात यावी निवडणूक आयोगाकडून जारी केलेल्या मार्गसूचीबाबत जागृती करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोगाकडून जारी केलेल्या मार्गसूचीनुसार खर्च करावा लागणार आहे. यासाठी त्यावर नजर ठेवण्यात यावी, याबरोबरच आदर्श आचारसंहितेचे पालन करणे तितकेच गरजेचे आहे.

आचारसंहिता उल्लंघन करणाऱ्या प्रकरणांवरही नजर ठेवण्यात यावी. अशा विषयांबाबत निवडणूक अधिकारी आणि संबंधित नोडल अधिकाऱ्यांना माहिती देण्यात यावी, असे एम. के. अरविंदकुमार यांनी सांगितले. यावेळी माहिती खात्याचे अधिकारी एमसीएमसी नोडल अधिकारी गुरुनाथ कडबूर म्हणाले, सर्व टीव्ही चॅनेल व बेळगाव जिल्ह्यातून प्रसिद्ध होणाऱ्या मराठी, कन्नड, इंग्रजी वृत्तपत्रांमधील निवडणुकीच्या बातम्या व जाहिरात संदर्भात नजर ठेवली जात आहे. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास तात्काळ निवडणूक अधिकाऱ्यांना एमसीएमसी नोडल अधिकारी व खर्च निवडणूक अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले जात आहे. समाज माध्यमांवर नजर ठेवण्यासाठी विशेष पथक असून प्रत्यक्षरित्या पाहणी केली जात असल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले. यावेळी तहसीलदार सिद्राय भोसगी, माध्यम विभागाचे अधिकारी जी. सय्यद, व्ही. एम. कंग्राळकर, एम. एम. पाटील, एस. एस. घोरपडे, ए. बी. कामण्णावर, एम. सी. निचंकी उपस्थित होते.

Advertisement

स्ट्राँगरुमची पाहणी

बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी येथील आरपीडी महाविद्यालयामध्ये स्ट्राँगरुमची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर ठिकाणी एम. के. अरविंदकुमार यांनी भेट देऊन स्ट्राँगरुमची पाहणी केली. याबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या सुविधा केंद्राला भेट देऊन कामकाजाबद्दल माहिती घेतली.

Advertisement
Tags :

.