Sangli : कवठेमहांकाळ शितल पाटील यांची बिनविरोध नगराध्यक्षपदी निवड
कवठेमहांकाळ नगराध्यक्षपदी शितल अजय पाटील यांचा एकमेव अर्ज
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ नगराध्यक्षपदासाठी नगरपंचायत नगरसेविका शितल अजय पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असून त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. ही निवड माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाच्या समर्थनात झाली आहे.
मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांच्याकडे शितल पाटील यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नगराध्यक्षपदासाठी दुसरा कोणताही अर्ज न आल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
यापूर्वी नगराध्यक्ष रणजीत घाडगे यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर नगराध्यक्षपद रिक्त झाल्यामुळे जिल्हाधिकारी काकडे यांनी निवड प्रक्रिया घोषित केली. या निवडणुकीसाठी मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांची पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. १७ रोजी पाटील यांच्या निवडीची घोषणा करण्यात येणार आहे.